कर्तव्यात कसूर, लफडी, खंडणी यांनी गाजली वणीतील तत्कालीन ठाणेदारांची कारकीर्द

नवीन ठाणेदारांकडून वणीकरांना मोठ्या अपेक्षा, घरफोडी, अवैध धंद्यांना बसणार का अंकुश?

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या सव्वा वर्षांत 3 ठाणेदार वणी पोलीस स्टेशनला लाभले आहे. त्यातील एका ठाणेदाराला कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणावरून बदलून जावे लागले. तर एका ठाणेदारावर खंडणीचा आरोप झाला होता. शुक्रवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी पीआय प्रदीप शिरस्कर यांनी वणी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शहरात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. यावर अंकुश बसवण्यात आधीचे दोन्ही ठाणेदार सपशेल अपयशी ठरल्याने नवीन ठाणेदारांकडून वणीकरांना मोठी अपेक्षा आहे.

अलिकडच्या ठाणेदारांची वादग्रस्त कारकीर्द
2018 च्या अखेरीस बाळासाहेब खाडे यांनी वणीतील ठाणेदार पदाचा कार्यभार स्वीकारला. काही काळानंतर जानेवारी 2019 मध्ये शहरातील प्रगतीनगर येथे एक ‘कांड’ घडले. त्यात तत्कालीन ठाणेदार बाळासाहेब खाडे यांचे नाव आले. त्यातून त्यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. त्यानंतर वैभव जाधव यांनी ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला. त्यांची अडीच वर्षांची कारकीर्द समाधानकारक ठरली. अवैध धंदे व भाईगिरीला सुरुंग लावण्यात त्यांना ब-यापैकी यश आले. 30 ऑगस्ट 2021 रोजी वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली (विनंती बदली) झाली.

वैभव जाधव यांची बदली झाल्यानंतर शाम सोनटक्के यांनी ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी सुरुवातीलाच ‘तुम्ही फक्त साद घाला, त्याला प्रतिसाद देणार’ अशी ग्वाही वणीकरांना दिली. मात्र त्यांची ही ग्वाही पोकळ असल्याचे लवकरच सिद्ध झाले. काही दिवसातच शहरातील अवैध धंदे सुरू झाले. एकीकडे चुटुरफुटूर कारवाई करून शहरात अवैध धंदे बंद केल्याचा त्यांनी आव आणला, तर दुसरीकडे राजरोसपणे शहरात मोठे अवैध धंदे सुरू होते. दरम्यान डीआयजी पथकाने मटका अड्यावर व अवैध तंबाखू विक्रेत्यांवर धाड टाकत त्यांच्या कर्तव्यदक्षतेतील फोलपणा उघड केला. पुढे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेऊन त्यांची बदली करण्यात आली.

शाम सोनटक्के नंतर रामकृष्ण महल्ले यांची ठाणेदार म्हणून वणीत एन्ट्री झाली. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्यांनी देखील वणीकरांची निराशाच केली. शहरात अवैध धंद्यात झालेली वाढ, शहरात सातत्याने होणारे घरफोडीचे सत्र इ. यावर त्यांना अंकुश बसवता आला नाही. ठाणेदारांचे ठाण्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याचा आरोप महल्ले यांच्यावर झाला. त्यातच ठाण्यातच दोन पोलीस कर्मचा-यांची हाणामारी झाल्याने ठाण्याच्या अब्रुचे लक्तरे वेशीवर टांगली गेली. अनेक प्रकरणात कर्मचारी परस्पर सेटिंग करीत असल्याचा आरोपही सातत्याने व्हायचा. दरम्यान एका पत्रकारावर चोरट्याने भीषण हल्ला केला. त्यातच शहरातील एका डॉक्टरांनी महल्ले यांच्यावर 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप महल्ले यांच्यावर थेट एसपी समोर केला. अखेर त्यांची बदली करण्यात आली. त्यांचा हा कार्यकाळही काही महिन्याचाच ठरला.

पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ !
पोलीस स्टेशनला सर्वसामान्य आपल्या तक्रारी देण्यासाठी जातात. मात्र केवळ लेखी तक्रार घेऊन गुन्हा दाखलच केला जात नाही, असा आरोप अलिकडच्या काळात पोलीस ठाण्यावर होत आहे.  घरफोडी, दुचाकीचोरी इत्यादी अनेक घटनांमध्ये पोलिसांनी अनेकदा तक्रारी दाखल न केल्याचे समोर आले आहे. याशिवाय एखादा गंभीर गुन्हा घडला असताना गुन्ह्याची तीव्रता कमी दाखवण्याचे प्रकार देखील झाले. लाखोंची चोरी देखील काही हजारांची दाखवण्याचा प्रताप राम-शाम यांच्या काळात चांगलाच फोफावला आहे. गुन्हाच दाखल न झाल्याने वरती यांचा रेकॉर्ड चांगला असायचा, मात्र शहरातील कारभार मात्र राम भरोसे राहायचा. एसपी यांनी महल्ले यांच्या कार्यकाळात गुन्हे कमी घडत असल्याचे सांगत महल्ले यांची पाठराखण केली होती, तेव्हा काही पत्रकारांनी सत्य परिस्थिती एसपींसमोर मांडली होती.

रामकृष्ण महल्लेनंतर एपीआय माया चाटसे यांना वणी पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. या दोन महिन्यांच्या कार्यकाळात त्यांना एक चांगली संधी मिळाली होती. मात्र या संधीचे त्यांना सोने करता आले नाही. त्यांना केवळ 11 वाजताच्या आत धाबे बंद करण्यासाठी धाबे मालकावर वचक बसवण्यात यश आले. मात्र शहरात निगरगट्ट व उन्माद झालेल्या चोरट्यांवर त्यांना वचक बसवता आला नाही. शहरात सातत्याने सुरू असलेल्या चोरी, घरफोडीच्या घटना कमी होण्याऐवजी उलट त्या वाढल्या. एकाच आठवड्यात 10 दुकाने फोडण्याचा रेकॉर्ड चोरट्यांनी केला. शिवाय शहरात ठिकठिकांनी राजरोसपणे प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री होत असतानाही, पानठेल्यावर धाड टाकून खर्रे जप्त करण्याचे प्रकार देखील त्यांच्या या अल्पकाळात घडले.

ठाणेदार पीआय प्रदीप शिरस्कर यांच्यासमोरील आव्हाने
वैभव जाधव यांची बदली झाल्यानंतर सव्वा वर्षात वणी पोलीस ठाण्यात 3 ठाणेदार आले. यातील आधीचे दोन ठाणेदारांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. पीआय प्रदीप शिरस्कर त्यांनी नुकताच वणी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. शहरात सध्या दुचाकीचोरी व घरफोडीने सर्वसामान्य चांगलेच त्रस्त झाले आहे. याशिवाय मटका, क्रिकेट बेटिंग, सुगंधी तंबाखूची विक्री, अवैध दारू विक्री ही देखील सातत्याने सुरू आहे. सोनटक्के यांना शहरात राजरोसपणे सुरू असलेली अवैध तंबाखू विक्री चांगलीच भोवली होती हे विशेष !

नवीन ठाणेदार आले की काही दिवस मटका पट्टीसह इतर अवैध धंदे बंद असते. मात्र काही दिवसात ते पुन्हा सुरू होते. शहरातील अनेक चौकात छुप्या पद्धतीने मटका सुरू असतो. वणी पोलीस ठाण्या अंतर्गत येणा-या ग्रामीण भागातही मटका चांगलाच फोफावला आहे. क्रिकेट आले की बेटिंगला उधाण येते. अवैध दारूविक्री ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे, सुगंधी तंबाखू विक्री तर शहरात खुलेआम सुरू आहे. अशा अनेक अवैध धंद्यांवर अंकुश ठेवला जावा अशी अपेक्षा ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे. या अपेक्षेवर ते कितपत उतरतात हे येणा-या काही काळातच स्पष्ट होईल.

दोन वर्षात वणी उपविभाग चांगलाच बदनाम
केवळ वणीचे ठाणेदारांची च नाही तर या दीड-दोन वर्षांत वणी उपविभागात येणार अनेक ठाणेदारांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. दीड वर्षांआधी शिरपूर येथील तत्कालीन ठाणेदारांवर अवैध वाहतुकीवर निर्बंध घालण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी मुकुटबन पोलीस ठाण्याच्या ठाणेदारावर होमगार्डमार्फत खंडणी मागितल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्यांची देखील बदली करण्यात आली. तर अलीकडे पाटण येथील महिला सिंघम ठाणेदारांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही चांगलीच गाजली होती. त्यातून त्यांची देखील बदली करण्यात आली.

Comments are closed.