लोकसभेचा निकाल ठरवणार वणी विधानसभेचा उमेदवार !

कुणबी फॅक्टर चालला तर मिळणार कुणबी उमेदवारांना संधी?

निकेश जिलठे, वणी: लोकसभेचा निकाल येण्यास आता अवघा काही कालावधी उरला आहे. मात्र या निवडणुकीकडे केवळ उमेदवार किंवा मतदारांचेच नाही, तर वणी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचेही लक्ष लागले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात कायमच नॉन कुणबी उमेदवारांचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी लोकसभेत निवडणुकीत कुणबी फॅक्टर चालला. प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला. तर कुणबी उमेदवारांना संधी मिळू शकते, अशी आशा भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षातील इच्छुक कुणबी उमेदवारांना आहे. त्यामुळे कुणबी उमेदवारांना संधी मिळणार? की नॉन कुणबी वर्चस्व कायम राहणार? याची मोठी उत्सुकता निकालाआधी मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. 

गेल्या साडे तीन दशकांत काँग्रेसतर्फे वामनराव कासावार यांच्या रुपात नॉन कुणबी उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. गेल्या 7 निवडणुकीपैकी (1990 ते 2019) 4 वेळा दणदणीत विजय मिळवत त्यांनी त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट उत्तम ठेवला आहे. मात्र 2004 मध्ये, 2014 व 2019 असा सलग दोन वेळा त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

युतीच्या काळात वणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला होता. शिवसेनेने कायम कुणबी विरुद्ध नॉनकुणबी अशी लढत ठेवली. वामराव कासावार यांच्या विरोधात 1990 मध्ये दिवंगत दे. मा. ठावरी तर 1995 व 2000 च्या निवडणुकीत विनोद मोहीतकर हे कुणबी उमेदवार शिवसेनेतर्फे वामनराव कासावार यांच्या विरोधात उतरवले. मात्र या तिन्ही निवडणुकीत कुणबी उमेदवारांना नॉन कुणबी उमेदवाराद्वारा पराभव पत्करावा लागला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

2004 मध्ये शिवसेनेने आधीचीच स्ट्रॅटेजी कायम राखत नॉन कुणबी विरुद्ध कुणबी अशीच लढत ठेवली. मात्र उमेदवार बदलवला गेला. त्यांनी मोहितकर यांच्या ऐवजी विश्वास नांदेकर यांना संधी दिली. यावेळी 15 वर्षानंतर वणी विधानसभा क्षेत्रात कुणबी फॅक्टर चालला. विश्वास नांदेकर यांनी वामनराव कासावार यांचा पराभव केला. मात्र 2009 च्या निवडणुकीत त्यांना कासावार यांच्या कडून पराभव पत्करावा लागला.

2014 मध्ये युती तुटल्यावर राष्ट्रवादी व शिवसेनेने कुणबी तर काँग्रेसने नॉन कुणबी उमेदवार निश्चित केला. मात्र भाजपने तिन्ही कुणबी उमेदवार राहिल्यास काँग्रेस सहज विजय मिळवणार, असे गृहीत धरून नॉन कुणबी उमेदवाराला संधी दिली. त्यामुळे 2014 च्या वेळी 2 नॉन कुणबी विरुद्ध 2 कुणबी उमेदवार अशी लढत झाली. या मतदारसंघात संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विजय मिळवला. काँग्रेसच्या हातातून पुन्हा मतदारसंघ गेला पण मतदारसंघ नॉन कुणबी उमेदवाराकडेच राहिला.

2019 च्या वेळी सेना -भाजप युती झाली. मात्र 2014 च्या भाजपच्या विजयाने वणी मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला. हा मतदारसंघ सेनेच्या वाट्यातून भाजपने आपल्या कोट्यात खेचून आणला. या निवडणुकीतही संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दणदणीत विजय मिळवला. गेल्या 35 वर्षांच्या काळात अवघ्या 1 वेळा विश्वास नांदेकर यांच्या रुपात कुणबी उमेदवाराला विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

लोकसभेला चालणार कुणबी फॅक्टर?
वणी विधानसभा क्षेत्र हा कुणबी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भाजपतर्फे व काँग्रेसतर्फे (35 वर्षात) विधानसभेत आतापर्यंत नॉन कुणबी उमेदवार उतरवला गेला आहे. दोन्ही मोठ्या पक्षातर्फे कायमच नॉन कुणबी उमेदवारांना संधी दिली गेली, त्यामुळे कुणबी वोटर दुरावल्याची चर्चा होत राहते. या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा कुणबी उमेदवारावर विश्वास दाखवला. लोकसभेला कुणबी फॅक्टर चांगलाच चालल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. जर प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला, तर यात सर्वात मोठा वाटा कुणबी फॅक्टरचा असल्याची चर्चा आहे. जर त्यांचा विजय झाला, तर कुणबी उमेदवारांना संधी मिळू शकते, अशी आशा भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षातील इच्छुक कुणबी उमेदवारांना आहे.

कोण आहेत इच्छूक?
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात इच्छुक कुणबी उमेदवार आहेत. सध्या कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांची काँग्रेसतर्फे दावेदारी राहणार आहे. विविध उपक्रम, आंदोलन याद्वारे त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा सपाटा लावला आहे. याशिवाय ऍड देविदास काळे, टीकाराम कोंगरे हे देखील इच्छुकांच्या यादीत पुढे आहेत.

भाजपतर्फे इच्छुक कुणबी उमेदवारांच्या यादीत तारेंद्र बोर्डे यांचे नाव वरती आहे. वणी शहरात विविध विकासकामांद्वारे त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. यांच्यासह 2014 मध्ये थोडक्यात भाजपचे तिकीट हुकलेले विजय पिदूरकर यांचे नावही इच्छुकांच्या यादीत पुढे आहे. याशिवाय आणखी काही कुणबी उमेदवार देखील चर्चेत आहेत.

शिवसेनेत तगडी फाईट
वणी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2004 मध्ये यावर सेनेने भगवा फडकवला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह सेनेचाही या मतदारसंघावर दावा राहणार आहे. हा मतदारसंघ सेनेला (उबाठा) सुटल्यास यात माजी आमदार विश्वास नांदेकर यांचा पहिला दावा राहणार आहे. मात्र संजय देरकर यांनी गेल्या एक ते दिड वर्षांपासून गावखेड्यात दौरे सुरु करत जनसंपर्क वाढवला आहे. शिवाय 2019 च्या निवडणुकीत अपक्ष राहून त्यांनी लक्ष्यवेधी मतं घेतली होती. त्यामुळे संजय देरकर व विश्वास नांदेकर यांच्यात तिकीटासाठी तगडी फाईट दिसू शकते.

या व्यतिरिक्त इतरही इच्छुक कुणबी उमेदवार दोन्ही पक्षात आहे.नॉन कुणबी उमेदवारांमध्ये काँग्रेसमध्ये डॉ. महेंद्र लोढा, तर भाजपमध्ये विजय चोरडिया, रवि बेलुरकर हे देखील दावेदार राहणार आहेत. मारेगाव आणि झरी तालुक्यातून देखील इच्छुक आहेत. मात्र या उमेदवारांना भाजपमधून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व काँग्रेसमधून वामनराव कासावार यांचे तगडे आव्हान राहणार आहे. वणी विधानसभेसाठी कुणबी की नॉन कुणबी उमेदवार याचे बरेचशे गणित हे लोकसभेच्या निकालावर अवलंबून राहणार, असे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लोकसभेच्या निकालाकडे लागले आहे. 

Comments are closed.