विठ्ठलवाडी येथे शेकोटीच्या वादातून जातीय अपमान व धक्काबुक्की

आरोपीविरोधात ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेतले. शेकोटीसाठी काड्या नेण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस जातीय अपमान, धमकी व धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, राहुल कृष्णाजी चंदनखेडे (वय 40) हे खासगी व्यवसाय करत असून विठ्ठलवाडी, वणी येथील रहिवासी आहे. त्यांच्या घराशेजारी राहणारे प्रकाश मुकिंदा भोयर (वय 50) आणि राजेश मारोती खोंडे (वय 40) राहतात. रविवारी दिनांक 11 जानेवारी रोजी प्रकाश व आरोपी राजेश यांच्यात शेकोटीसाठी काड्या नेण्याच्या कारणावरून सायंकाळी सुमारे 07:30 वाजताच्या सुमारास वाद झाला. यावेळी प्रकाश भोयर यांना राजेश खोंडे याने थापडबुक्क्याने मारहाण केली. यात प्रकाशच्या दोन्ही हातांच्या ढोपरांना किरकोळ दुखापत झाली.

हा वाद सोडविण्यासाठी राहुल चंदनखेडे हे मध्ये गेले असता, आरोपी राजेश खोंडे याने त्यांना उद्देशून जातीय अपमानास्पद शब्द वापरले. तसेच धमकी देत धक्काबुक्की केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी परिसरातील अनेक लोक उपस्थित होते. त्यानंतर राहुल चंदनखेडे यांनी जखमी प्रकाश भोयर यांना घेऊन थेट वणी पोलीस ठाणे गाठले व संपूर्ण प्रकाराची तक्रार दाखल केली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी राजेश मारोती खोंडे याच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 चे कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.