पाटाळाच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वणी वरोरा मार्ग बंद

वर्धा व पैनगंगा नदीकाठावरील 'त्या' गावांना पुन्हा पुराचा धोका

जितेंद्र कोठारी, वणी : अपर वर्धा, लोअर वर्धा व बेंबळा धरणातुन मोठया प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वर्धानदीवरील पाटाळा येथील पुलाच्यावरुन नदीचे पाणी वाहत असल्याने सोमवारी सायंकाळी 5 वाजता पासून वणी वरोरा मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली. वाहतूक विभागाने रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहने पुढे जाण्यास मनाही केली आहे. दरम्यान नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने वर्धा नदी काठावरील वणी तालुक्यातील ‘त्या’ अकरा गावांना दुसऱ्यांदा पुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा प्रकल्पाचे 13 गेट 230 से.मी., वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरणाचे 31 गेट 70 से.मी. व यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे 10 गेट 250 से.मी. उघडण्यात आले आहे. तर इसापूर धरणातील 5 गेटमधून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वर्धानदी व पैनगंगा नदी काठावरील गावातील रहिवाशांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वणी तालुक्यात झोला, कोना, शेलु(खु.), रांगणा वडा, जुगाद, सावंगी (जुनी), सावंगी (नवीन), मुंगोली, माथोली, चिंचोली, जुनाड, कोलगाव वर्धा नदी व पैनगंगा नदी किनाऱ्यावर वास्तव्यास आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरात या गावांना पाण्याने वेढा घातला होता. तालुक्यातील हजारो एकर शेती पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली होती. कोना, झोला, शेलु गावातील हजारो नागरिकांना सावर्ला येथे स्थलांतरित करण्यात आले होते.

राज्यात येत्या 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यावरून पाणी वाहत असताना पाण्यातून जाणे किंवा वाहन काढणे टाळावे. नदी काठावरील गावातील नागरिकांनी आपले पशुधन व किमती साहित्यासह सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

Comments are closed.