वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सव्वा कोटिंचा अपहार

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, अध्यक्षांसह चार जणांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: आपली कमाई किंवा आयुष्याची जमापुंजी अनेकजण बॅंकेत किंवा पतसंस्थेत जमा करतात. त्यापाठीमागे त्यांचा विश्वास आणि भविष्यात मिळणाऱ्या लाभाची अपेक्षा असते. मात्र कधी कधी याच विश्वासाला प्रचंड तडा जातो. नेमकं हेच राजूर कॉलरी येथील वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या बाबतीत घडलं. येथे 1 कोटी 27 लाख 9 हजार 801 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तालुका लेखा परीक्षक अभय वसंतराव निकोडे यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप जानबा टेंबूर्डे (अध्यक्ष), रमेश मोलीराम कनोजीया (सचिव), संजय अर्जुन शेटीया (लिपीक) आणि मदन कृष्णाजी अंडूस्कर (तत्कालीन लिपीक) यांनी संगनमत करून 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 या कालावधीत हा अपहार केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आरोपींनी संस्थेच्या सीसी कर्ज खात्यातील रकमा परस्पर विड्रॉल केल्यात. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार होते. त्यांनी अधिकारांचा गैरवापर करून बनावट चेकच्या सहाय्याने वेळोवेळी रकमा काढल्या आणि त्या रकमा कॅशबुकला जमा न करता अपहार केला.

या अपहारातून संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आरोपींनी स्वतःला आर्थिक लाभ करून घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 34, 120 (ब) अंतर्गत गुन्हे दाखल केलेत. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करीत आहेत.

Comments are closed.