बहुगुणी डेस्क, वणी: वेल्डिंगचे काम करणा-या एका कामागाराला वीजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. हिवरा (मजरा) ता. मारेगाव येथे सोमवारी दिनांक 17 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश अशोक जरीले (27) असे मृतकाचे नाव आहे. तो गावातच एका वेल्डिंगच्या दुकानात वेल्डिर म्हणून काम करायचा.
सविस्तर वृत्त असे की सोमवारी नीलेश हा गावातीलच एका व्यक्तीकडे दुपारी वेल्डिंगच्या कामासाठी गेला होता. काम सुरु असताना लाईट गेली. बराच वेळ लाईन न आल्याने 3.30 वाजताच्या सुमारास नीलेश हा काम बंद करण्याच्या तयारीला लागला व त्याने वायर गुंडाळायला सुरुवात केली. मात्र त्यावेळी बोर्डावरून वायर काढण्याचे तो विसरला किंवा अनावधानाने राहून गेले.
वायर गुंडाळत असतानाच अचानक लाईट आली व त्याचा शॉक नीलेशला लागला. तो खाली पडला. घरातील व्यक्तींनी बोर्ड बंद केला व याची माहिती शेजा-यांना दिली. घराजवळील लोकांनी त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
नीलेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. नीलेशच्या पश्चात आई वडील, दोन विवाहित बहिणी व आप्तपरिवार आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.