निकेश जिलठे, वणी: एकीकडे महाविकास आघाडीची दाणादाण उडाली असताना दुसरीकडे वणीत मात्र शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांनी विजय मिळवला आहे. संपूर्ण विदर्भात सेनेचे अवघे 4 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे देरकर यांच्या परफॉरमन्सकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे एक लोकप्रिय लोकप्रितनिधी होते. त्यांनी विधानसभा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात फंड खेचून आणला. परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झालीत. त्यामुळे देरकर निवडून आल्यानंतर यांची केवळ जबाबदारी वाढलेली नाही तर त्यांच्यासमोरील आव्हानं देखील आता वाढली आहेत. शिवाय काही गोष्टी त्यांच्यासाठी भविष्यात घातक देखील ठरू शकतात. याचीच आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
विधानभवन गाजवण्याची संधी
भाजप व महायुतीला बम्पर यश मिळाल्याने विरोधी बाकावरची संख्या आता कमी झाली आहे. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले. यात सेना 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 10 तर इतर मित्रपक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत. विदर्भात सेनेला वणीसह केवळ मेहकर, बाळापूर, दर्यापूर या जागांवर विजय मिळाला आहे. संजय देरकर यांना उबाठा पक्षातून विदर्भातून नेतृत्त्व करण्याची चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेत विधानसभा गाजवण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
दुस-या फळीतील नेत्यांची जबाबदारी
लवकरच नगरपालिका व जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. दुस-या फळीतील अनेक नेत्यांनी तसेच तरुण कार्यकर्त्यांनी देरकर यांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी निवडणुकीत देरकर यांना प्रामाणिकपणे मदत केली. यातील अनेक नेते व कार्यकर्ते हे जिल्हापरिषद व नगरपालिकेसाठी इच्छुक आहेत. त्यांना आतापासून बळ देणे, त्यांना विजयी करण्याची जबाबदारी आता देरकर यांच्यावर राहणार आहे. यासह आपल्या भागात अनेक सहकारी संस्था आहेत. याच्या निवडणुकीला बराच अवधी आहे. मात्र याची आतापासून तयारी करण्याची जबाबदारी देरकर यांच्यावर राहणार आहे.
नगरपालिका काबिज करण्याचे आव्हान
विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात देरकर यांना चांगली लीड मिळाली. मात्र वणी शहरात बोदकुरवार यांना मतदारांनी कल दिला आहे. शहरात मोठी लीड बोदकुरवार यांना मिळाली आहे. लवकरच नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. यावेळीही जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया राबवली जाण्याची अधिकाधिक शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत 26 पैकी 22 जागा भाजपने काबिज केल्या होत्या. तर अपक्षांना 4 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत सेनेला खातेही उघडता आले नव्हते. तर नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवाराची कामगिरी निराशाजनक होती. यावेळी नगरपालिकेत अधिकाधिक जागा काबिज करणे व नगराध्यक्ष पदी सेनेचा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान देरकर यांच्यापुढे राहणार आहे.
प्रलंबित कामांची जबाबदारी
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मोठ्या प्रमाणात वणी विधानसभा क्षेत्रासाठी फंड खेचून आणला. यातील अनेक कामे सध्या निर्माणाधीन आहे तर काही कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ही अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करणे. ज्या कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही अशा कामांचा पाठपुरावा करणे. ही प्रलंबित कामे तात्काळ निकालात काढण्याचे मोठे आव्हान देरकर यांच्या पुढे राहणार आहेत. शहरातील अनेक रस्ते, बाग याचे काम सध्या थांबले आहे. यासह बोदकुरवार यांच्या काळात शहरातील विशिष्ट भागाचा विकास झाला, असा आरोप झाला. मतदारसंघाचा विकास करताना ग्रामीण तसेच शहरातील इतर भागातही विकास करण्याची जबाबदारी देरकर यांच्यावर राहणार आहे. यासह वीज, रस्ते, पांदण रस्ते, पाणी प्रश्न यासह आरोग्य सेवांची देखील मोठी समस्या आहे. उत्तम आरोग्य सेवा हे अद्यापही कोणत्याही लोकप्रतिनिधींना जमले नाही.
जनसंपर्क वाढवण्याची गरज
मितभाषी, प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमा व झोल झपाट्यापासून कायम दूर राहणारे नेते अशी देरकर यांची ओळख आहे. मात्र स्वच्छ प्रतिमा असूनही त्यांचा अद्यापही काही भागात जनसंपर्क अपुरा आहे. बोदकुरवार यांच्या जनसंपर्कात जनता दरबार याचा मोठा समावेश आहे. त्याचा त्यांना निवडणुकीत मोठा फायदा झाला. देरकर यांना देखील अधिकाधिक जनसंपर्क वाढवण्याची गरज आहे. यासह नेते नाही तर लोकनेता अशी प्रतिमा तयार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. देरकर यांच्या विजयाने मतदारसंघात सेनेचे नेतृत्त्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. झरी व मारेगाव तालुक्यातील काही भागात त्यांना पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणखी परिश्रम घेण्याची गरज आहे.
मीडियाबाबत उदासिन धोरण झटकणे
देरकर हे कायम प्रसिद्धीपासून दूर राहतात. सवंग प्रसिद्धीच्या तर ते कोसो दूर राहतात. त्यांनी केलेल्या कोणत्याही कामाची मीडियातून फारशी प्रसिद्धी होत नाही. त्यामुळे कामे करूनही ते कामं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. मात्र सध्या प्रचार, प्रचाराचा काळ आहे. भाजप मीडियाचा सर्वाधिक वापर करतो. यात प्रिन्ट व डिजिटल मीडियाचा मोठा वाटा आहे. देरकर यांना मीडियाबाबत असलेले उदासिन धोरण झटकून मीडियाचा अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे. यासह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तरुणाई सक्रिय आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याचे सोशल मीडिया हे उत्तम साधन आहे. त्याचा देखील अधिकाधिक वापर करून नव्या पिढीशी, नवमतदारांशी संवाद साधण्याची गरज त्यांना भासणार आहे.
प्रामाणिक कार्यकर्ते टिकवण्याचे आव्हान
निवडणुकीच्या काळात विविध छोट्या मोठ्या संघटनेचे, संस्थांचे, विविध समाजाचे चांगले कार्यकर्ते देरकर यांच्याशी नव्यानेच जुळले. या संघटना किंवा कार्यकर्ते जरी छोटे असले तरी, त्यांची थोडी का होईना ताकद आहे. यातील अनेक कार्यकर्ते हे प्रामाणिक आहेत. यासह माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या कार्यप्रमाणीवर नाराज असलेले अनेक कार्यकर्ते देरकर यांच्याशी जुळले आहेत. असे प्रामाणिक कार्यकर्ते सोबत टिकवणे गरजेचे आहे. यासह कमिशनखोर, झोलर, केवळ आर्थिक स्वार्थ साध्य करण्यासाठी जवळ आलेले समर्थक, यांच्याशी अंतर ठेवून आपली स्वच्छ प्रतिमा जपण्याची मोठी जबाबदारी देरकर यांच्यावर राहणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या गोष्टी किंवा चुका बोदकुरवार यांना भारी पडल्या, त्या चुका टाळण्याचे देरकर यांच्यासमोर मोठे आव्हान राहणार आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
Comments are closed.