टाळेबंदीमुळे तळीरामाची घसा’बंदी’

काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्या...

0

जितेंद्र कोठारी, वणी: मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदी (लॉकडाउन) मुळे राज्यातील सर्व वाईन शॉप व बियरबार बंद असून तळीरामाचे घसे कोरडे पडले आहे. मद्यपानची सवयी असलेल्या अनेक मद्यपिनां आता विड्रॉल सिम्पटमचा त्रास होऊ लागलेला आहे. तर दुसरीकडे काळया बाजारात मद्याची विक्री होत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता निदान दररोज ठराविक वेळासाठी का होईना वाईन शॉप उघडण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केल्याची माहिती आहे. मात्र सद्य: परिस्थिती लक्षात घेता दारू दुकाने उघडण्याची परवानगी देणे शक्य नसल्याने राज्य उत्पादन शुल्क खात्याने सपशेल नकार दिल्याचे समजते.

मद्यविक्रीतून येणाऱ्या प्रत्येक शंभर रुपयांच्या महसूलापैकी 86 रुपये हे सरकारच्या तिजोरीत जातात आणि 14 रुपये विक्रेत्यांना मिळतात. विक्री बंद असल्यामुळे याचा परिणाम विक्रेत्यांप्रमाणेच सरकारी महसुलावर सुद्धा होत आहे असे असोसिएशनचे म्हणणे आहे. परंतु समजा ही दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्याबाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवण्यात येईल. यामुळे करोनाच्या प्रसारालाही हातभार लागू शकतो. दुकानं उघडली तर पोलिस व्यवस्थेवर सुद्धा प्रचंड ताण येईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

या विषयाला एक सामाजिक संदर्भसुद्धा आहे. सर्व आर्थिक व्यवहार जवळजवळ ठप्प असल्यामुळे आज तर कष्टकरी आणि मजूर वर्गाला उत्पन्नाचे साधन नाही. हे लोक आज कसंतरी आपलं घर चालवत आहेत. समजा मद्यविक्रीची दुकानं उघडली तर काही पुरुष वेळप्रसंगी घरच्यांना उपाशी ठेवून सुद्धा मद्य विकत घ्यायला कमी करणार नाहीत. त्यामुळे सद्य: स्थितीत राज्यात दारू दुकाने उघडण्याचे चिन्ह दिसत नाही .

राज्यात दर महिन्यात दारूची उलाढाल
महाराष्ट्रात दर महिन्याला साधारणपणे तीन कोटी लिटर देशी दारु, अडीच कोटी लिटर बिअर, पावणेदोन कोटी लिटर विदेशी मद्य आणि साधारणपणे सहा ते सव्वा सहा लाख लिटर वाईनची विक्री होते. एका महिन्यात उत्पादन शुल्क खात्याला साधारणपणे १,२०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो आणि त्यावर ८०० कोटी रुपयांचा विक्रीकर सुद्धा गोळा केला जातो.

काय आहे “विड्रॉल सिम्पटम” ?
कोणतेही ड्रग किंवा औषधीचे सततचे व्यसन असलेल्या व्यक्तीला दीर्घकाळ ड्रग मिळत नसल्यास त्या व्यक्तीवर होणाऱ्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामाला वैद्यकीय भाषेत “विड्रॉल सिम्पटम” म्हटल्या जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.