बैलबंडीवर वीज कोसळून एक महिला जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: शेतातील कामे आटोपून घरी परतताना अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोरज शिवारात घडली. यात सुदैवाने महिलेचा पती आणि त्यांच्या सोबत असलेले शेतमजूर वाचले आहे. तर बैलाला किरकोळ इजा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुवर्णा संजय कांबळे, वय अंदाजे 32 असे मृत महिलेचे नाव आहे. आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी ती आपल्या पती आणि एका व्यक्तीसोबत शेतामध्ये गेले होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास शेतातील कामे आटोपून पती आणि शेतमजूर व्यक्तीसोबत ते सर्व बैलबंडीने घरी परतत होते. अशातच गोरज फाट्याजवळ यांच्या बंडीवर अचानक वीज कोसळली. यात महिला जागेवरच मृत्यूमुखी पडली तर पती आणि सोबत असलेला शेतमजूर जागेवरच बेशुद्ध पडले होते. सोबतच बैलही खाली पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मागील अनेक दिवसांपासून परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र रविवारपासून पावसाने अचानक तालुक्यात एन्ट्री घेतली. या पावसासोबत विजेचा सुद्धा धुमाकूळ सुरु आहे. वणी तालुक्यातही एकाच वीज कोसळून मृत्यू झाला सततच्या वीज पडण्यामुळे मजुरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

Comments are closed.