बहुगुणी डेस्क, वणी: स्त्री ही शक्तीचं प्रतीक आहे. ती आदिशक्ती आहे. तिला आजच्या काळात अधिक बळकट करा. तिला तिच्या शक्तीची जाणीव करून द्या. असे प्रतिपादन प्रा. डॉ. नीलिमा दवणे यांनी केले. त्या मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज महिला मंचाद्वारे आयोजित जागतिक महिलादिन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी महिला मंचाच्या अध्यक्षा मंगला झिलपे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, वैद्य सुवर्णा चरपे उपस्थित होत्या.
डॉ. नीलिमा दवणे यांनी मुलींच्या आणि स्त्रियांच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला. त्या म्हणाल्यात की, मुलींना लाठीकाठी, कराटे, दांडपट्टा चालवायला शिकवा. तिला आत्मसंरक्षणाचे धडे द्या. तिच्याकडे वाईट नजरेने, वाकड्या नजरेने कोणी पाहू शकणार नाही अशा मुली, स्त्रिया घडवा. त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास बळकट करा. मुलींना प्रतिकारासाठी आत्मनिर्भर करा. आम्ही तुझ्यासोबत आहोत, एवढा तिला विश्वास द्या. यांसह त्यांनी विषयाच्या अनुषंगाने भाष्य केले.
पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले यांनी आत्मसंरक्षण आणि कायदेविषयक मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्यात की, महिलांच्या हिताचे अनेक कायदे आहेत. पोक्सो आणि लैंगिक अत्याचार, कौटुंबिक अत्याचार या महिलांविषयी असलेल्या अनेक कायद्यांची सर्वांनी माहिती ठेवावी.

आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य सुवर्णा चरपे सोनारे यांनी वैद्यकीय अंगाने स्त्रियांनी अनेक विषयांची माहिती दिला. स्त्रियांनी पोषक आहार घेतला पाहिजे. शरीरामध्ये लठ्ठपणा वाढवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. ते समजून घेतले पाहिजेत. आहार, निद्रा आणि व्यायामाबाबत आपण सतर्क असलं पाहिजे.
स्त्रिया आपल्या शरीरातल्या नाजूक हार्मोनल अवस्थेमुळे अत्यंत नाजूक असतात. प्रत्येक गोष्टींचा ठसा आपल्या प्रकृतीवर, आपल्या स्वास्थ्यावर पडत असतो. मला चांगलं जगायचं आहे, तर माझा ऑक्सिजन मी घेतला पाहिजे. आपल्या मनाचे पोषण ज्यांनी ज्यांनी होईल तो एक तरी कलागुण, छंद, आस्वाद आपण आपला जोपासला पाहिजे. चाळीशी नंतरच्या आयुष्याची पूर्वतयारी सुरुवातीलाच करायला हवी. त्यासाठी आपण आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे.
मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज महिला मंचाच्या अध्यक्ष मंगला झिलपे यांनी उपस्थित समाजभगिनींशी संवाद साधला. महिलादिनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच आयोजनाला सहकार्य करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी समाजातील कतृत्त्ववान महिलांचा सत्कार झाला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संगीता नवघरे लांडे यांनी केले. तर आभार जयश्री अंड्रस्कर यांनी मानलेत. सायंकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेत. मेघा झिलपे यांनी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले.

Comments are closed.