यवतमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांचा राजीनामा

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवार 1 ऑगस्ट रोजी त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा उप निबंधक यांच्याकडे लेखी राजीनामा सुपूर्द केला. अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच टीकाराम कोंगरे यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे हे काँग्रेस पक्षाचे खासदार स्व. बाळू धानोरकर यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस संचालकांची संख्या जास्त असल्यामुळे स्व. बाळू धानोरकर यांनी आपला राजकीय वजन वापरून पहिल्यांदा निवडून आलेले वणी येथील टीकाराम कोंगरे यांना अध्यक्ष बनविले. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतरच टीकाराम कोंगरे यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव असल्याचे बोलले जाते. अध्यक्ष पदासाठी इच्छुक काँग्रेस पक्षाचे काही संचालक कोंगरे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असताना त्यांनी स्वतःहुन राजीनामा दिला. टीकाराम कोंगरे यांनी राजीनामा दिल्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षानी 2 वर्ष 7 महिन्यानंतर राजीनामा दिल्याने बँकेचा पुढील अध्यक्ष कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेचे 21 संचालक पैकी काँग्रेस पक्षाचे 9, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4, शिवसेना (शिंदे) गट 3, शिवसेना (ठाकरे) गट 1, भाजप 2 व अपक्ष 2 असे संख्याबळ आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी दिला राजीनामा

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर 2 वर्ष 7 महिन्याच्या काळात बँकेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना वाढीव कर्ज मंजुरीसह पीक कर्जाचे उद्दिष्ठ जिल्हा बँकेने पूर्ण केले आहे. नवीन अध्यक्षांना माझा पूर्ण सहकार्य राहीन. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राजीनामा दिला असला तरी संचालक म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी माझे प्रयत्न सुरु राहणार.

टीकाराम कोंगरे – माजी अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.