गणेशोत्सवासाठी नातेवाईकाकडे आलेली तरुण मुलगी बेपत्ता

देवदर्शनासाठी नातेवाईक बाहेगावी गेल्यावर संधी साधून काढला पळ

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकांकडे आलेली तरुण मुलगी (18) घरून निघून गेली. ही तरुणी मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती 4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त तिच्या मोठे वडिलांकडे आली होती. 16 सप्टेंबर रोजी दुपारी तिचे नातेवाईक देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. यावेळी घरी त्यांचा 10 वर्षांचा मुलगा व तरुणी हे दोघेच होते. तिचे मोठे वडील व मोठी आई संध्याकाळी 5 वाजता घरी परत आले. यावेळी त्यांना त्यांची पुतणी घरी नसल्याने आढळले. त्यांनी त्यांच्या मुलाला याबाबत विचारणा केली असता त्याने ताई दु. 3 वाजता आपली बॅग घेऊन निघून गेली, असे सांगितले. त्यांनी त्यांच्या भावाला मुलगी घरी आली का विचारणा केली. मात्र त्यांनी घरी आली नसल्याचे सांगितले. मुलीचा आजूबाजूला व इतर नातेवाईकांना फोन करुन विचारणा करण्यात आली. मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. शेवटी 17 सप्टेंबर रोजी मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलिसात दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांआधीच मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण केली होती.

Comments are closed.