विवेक तोटेवार, वणी: शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. वणी शहरातील बीएसएनएल टॉवर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करत झिंगलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपीकडून गांजा भरलेली सिगारेट, माचीस तसेच गांजा भरण्यासाठी वापरण्यात येणारा ‘Tree Paper’ जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर (वय 31) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून युवराज विजय उपरे (वय 21, रा. जुना कॉटन मार्केट, आशीर्वाद हॉटेल मागे, वणी) याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 (क), 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 25 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.25 वाजताच्या सुमारास बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागील सार्वजनिक ठिकाणी आरोपी संशयित अवस्थेत आढळून आला. त्याची तपासणी केली असता तो गांजाचे सेवन केलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. आरोपीच्या जवळून गांजा भरलेली सिगारेट, माचीस आणि ‘Tree Paper’ लिहिलेले गांजा भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईनंतर वणी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 11.20 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक गजानन सावसाकडे करीत आहेत. शहरात अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



Comments are closed.