दारूच्या नशेत घरात घुसून वृद्धावर विळ्याने जीवघेणा हल्ला

धमकी देत मोबाईल फोडण्याचा प्रकार; तरुणावर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: दारूच्या नशेत घरात घुसून एका वृद्धावर विळ्याने प्राणघातक हल्ला करत मारहाण करण्यात आली. ही घटना 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री झरी तालुक्यातील दुर्भा गावात घडली. या प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आशन्ना गंगन्ना बिक्केवार (वय 62, रा. जुना दुर्भा, ता. झरी) हे आपल्या पत्नी व मुलीसह वास्तव्यास असून मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराशेजारी राहणारा कुंदन विनोद मेश्राम (वय 30) हा दारूच्या व्यसनाधीन असून तो नेहमी गावातील नागरिकांशी वाद घालत दहशत निर्माण करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दि. 23 डिसेंबर रोजी रात्री अंदाजे 7.00 वाजताच्या सुमारास, कुंदन मेश्राम हा दारूच्या नशेत हातात लोखंडी विळा घेऊन फिर्यादीच्या घराच्या लोखंडी गेटवरून उडी मारून घरात घुसला. त्यानंतर त्याने फिर्यादीस शिवीगाळ करत गावातील बक-या चोरतो, अशी बदनामी केल्याचा आरोप केला. रागाच्या भरात त्याने आशन्नावर विळ्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान विळा फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली गालावर लागून गंभीर जखम झाली व डोक्यालाही मार लागला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादीला जमिनीवर पाडून छाती व पाठीवर हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची नासधूस करून मोबाईल फोडून नुकसान केले. आरडाओरड ऐकून फिर्यादीची पत्नी गंगुबाई बिक्केवार व मुलगी बुजी यांनी मध्यस्थी करून त्यांना वाचवले. घटनेनंतर आरोपीने “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. जखमी अवस्थेत फिर्यादीने पत्नी व मुलीसह पाटण पोलीस ठाण्यात हजर राहून जबानी तक्रार दिली.

या प्रकरणी आरोपी कुंदन विनोद मेश्राम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 352, 351(3), 351(2), 333, 324(2), 118(1) व 115(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाटण पोलीस करीत आहेत. (ईमेज एआय जनरेटेड)

Comments are closed.