वनिता समाज शारदोत्सवात डॉ. पुंड यांचे व्याख्यान

0

बहुगुणी डेस्क, वणी: वनिता समाज द्वारे वणी नगरीत आयोजित शारदोत्सवाच्या प्रथम दिन शारदा महात्म्य या विषयावर डॉ. स्वानंद पुंड यांचे व्याख्यान झाले. “केवळ वय, शरीर किंवा सांपत्तिक स्थिती यांच्या वाढीने माणूस मोठा होत नाही. तर जेव्हा त्याच्या आनंदाचे विषय मोठे होतात तेव्हाच खऱ्या अर्थाने मोठा झाला असे म्हणता येते.खाणे पिणे झोपणे यातील आनंद तर पशूलाही घेता येतात पण साहित्य, संगीत आणि कला यातून मिळणारा आनंद हाच खरा मानवी आनंद असून तो मिळवणे हीच खऱ्या अर्थाने शारदोपासना होय.” असे निरूपण विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले.

तमोगुणप्रधान महाकालीच्या अर्थात जड पदार्थांच्या द्वारे मिळणाऱ्या आनंदातून वर उठत देवी लक्ष्मी अर्थात साधनसामग्रीतून मिळणाऱ्या आनंदापर्यंत जात त्याच्याही पलीकडे देवी सरस्वती च्या द्वारे अर्थात ध्यानाच्या,ज्ञानाच्या माध्यमातून परमानंदाची प्राप्ती करणे हेच मानवी ध्येय असायला हवे. असे सांगत कला ही शारीरिक स्तरावर, संगीत हे मानसिक स्तरावर, आनंद देणारे माध्यम असून साहित्यातून मिळणारा आनंद हा बौद्धिक स्तरावर मिळणारा सर्वश्रेष्ठ आनंद असतो. हे साहित्य, संगीत आणि कलेचे आनंद प्रदान करते तिला शारदा असे म्हणतात .

शरद ऋतू हा सर्व निसर्गचक्रातील संतुलन साधणारा ऋतू आहे. तसे जीवनातही शारदेच्या उपासनेने संतुलन स्थापित होते. प्रत्येक गोष्ट तिच्या कृपेने रसपूर्ण होते. त्यामुळेच तिला सरस्वती असे म्हणतात. तिच्या कृपेने जीवनात ही रसपूर्णता प्राप्त होते असे प्रा. पुंड यांनी विविध हे व्यावहारिक दाखल्यांच्या द्वारे उलगडून दाखविले. संचालन पल्लवी सरमुकद्दम, वक्त्यांचा परिचय अंजली भट, सत्कार मंजिरी दामले तर आभार प्रदर्शन अर्चना उपाध्ये यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.