2 किलोमीटरचा थरारक प्रवास… गर्भवती व वृद्धांसह 9 जण अडकले पुरात

बचाव पथकाची धडाकेबाज कामगिरी, 9 जणांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन सावंगी येथे पुरात अडकलेल्या 9 जणांची बचाव पथकाने सुटका केली. यात एका गर्भवती महिलेसह तीन मुले व एक मुत्रपिंडाचा आजार असलेल्या वृद्धाचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सावंगी येथे निर्गुडा नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला होता. त्यामुळे 9 लोक सावंगी व नवीन सावंगी गावात अडकले होते. बचाव करण्यात आल्यानंतर गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या चार दिवसांपासून वणी उपविभागात पावसाची संततधार सुरू आहे. वणी तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या सावंगी, मुंगोली, चिंचोली, वडा जुगाद, माथोली या गावाला पुराचा नेहमीच फटका बसतो. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर सावंगी हे गाव आहे. या गावाच्या एका बाजूला निर्गुडा नदी तर दुस-या बाजूला शेवाळा नाला आहे. सावंगी व नवीन सावंगी हे गाव निर्गुडा नदीमुळे वेगळे झाले आहे. नवीन सावंगी हे हजार लोकवस्तीचे गाव आहे. पावसाळ्यात हे गाव संवेदनशील मानले जाते.

निर्गुडा नदीला पूर आल्याने व शेवाळा नाला दुथडी भरून वाहत असल्याने त्याचा फटका सावंगी (नवीन) गावाला बसला आहे. या गावाला सध्या पाण्याचा वेढा आहे. त्यामुळे या गावाचा तीन ते चार दिवसांपासून संपर्क तुटला आहे. दरम्यान गावातील एक गर्भवती महिला, एक लहान मुलगा व एका वृद्धाला उपचारासाठी वणीला जायचे होते. मात्र पुरामुळे ते नवीन सावंगी गावात अडकले होते. तर नवीन सावंगी येथील चार जण हे वणीला बाजारासाठी आले होते. मात्र पूर आल्याने ते सावंगी येथे अडकले होते. तर इतर दोघेही पुरामध्ये अडकले होते.

पुरामुळे 3 रुग्ण उपचाराविना असल्याची माहिती गावक-यांनी प्रशासनाला दिली होती. प्रशासनाने तातडीने बचाव पथक पाठवले. दुपारी 4 वाजताच्या सुमारास बचाव पथक सावंगी येथे दाखल झाले. त्यांनी गर्भवती महिला, एक वृद्ध व एका बालकाला बोटीद्वारा नवीन सावंगी या गावातून सावंगी या गावाच्या घाटापर्यंत सोडण्यात आले. सुमारे दोन किमीचा हा थरारक प्रवास होता. तर सावंगी येथील अडकलेल्या 6 जणांना त्यांचे गाव नवीन सावंगी येथे बोटीद्वारा सोडण्यात आले. रेस्क्यू करण्यात आलेल्यांमध्ये रामचंद्र वाघमारे, शांता वाघमारे, बंडू वाघमारे, विजू खिरटकर, वेदांत खिरटकर, मनीष खिरटकर, प्रदीप आसूटकर, निराक्रश आसुटकर व एक गर्भवती महिला यांचा समावेश आहे.

सदर बचाव पथक हे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आले आहे. तहसीलदार निखिल धुळधर यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, नगरपालिका पथकाची चमू, पोलीस विभागाच्या चमू मिळून करण्यात आले आहे. सदर कामगिरी पुकार वाकोडे, अमर भवरे, सागर केराम, सुभान अली यांनी पार पाडली. या धडाकेबाज कारवाईबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बचाव पथकाचे अभिनंदन केले.

हे देखील वाचा: 

नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड, वणीतील दिग्गज नेते आजमावणार नशिब

मासे पकडायला गेलेला तरुण तलावात बुडाला

Comments are closed.