कुंभारखणी खाणीत विषारी वायुने दोघांचा मृत्यू

दोन जण गंभीर, परिसरात हळहळ

0
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुंभारखनी येथील बंद असलेल्या खाणीत गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोन इसमाचा मृत्यू झाला. तर खाणीतील पंप सुरू करण्यासाठी गेलेले दोन वेकोली कर्मचारी बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे. मृतामधील एक इसम हा वेकोलिचा कर्मचारी आहे.
सविस्तर वृत्त असे की, कुंभारखणी खदान ही गेल्या 1 वर्षांपासून बंद आहे. त्या बंद खाणीत आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास गुड्डू कुमार रामेश्वर सिंग (32) व राजकुमार महेंद्र सिंग (35) राहणार औरंगाबाद हे दोघे कुंभारखणी येथील बंद असलेल्या खाणीत गेले. यातील गुड्डू हा वेकोलीत कर्मचारी आहे तर राजकुमार हे गुड्डू याचे मामा आहेत. तो आपल्या मामाला खान दाखविण्यासाठी गेल्याचे समजते.
गुड्डू हा अगदी काही दिवसांगोदरच वेकोलित नोकरीला लागला होता. त्याला वेकोलीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने हे दोघेही कुंभरखनी येथील खाण बघण्याकरिता गेले. खाणीत मध्ये थोडा दूर जाताच खाणीतून निघालेल्या विषारी वायुने हे दोघेही त्याच ठिकाणी पडले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वेकोलीचे दोन कर्मचारी महादेव तेलंग व बंडू ठेंगणे हे खाणीतून पाणी काढण्याचा पंप सुरू करण्याकरिता गेले. या दोघांनीही गुड्डू व त्याच्या मामाला पडून असल्याचे बघितले.
त्यांच्या जवळ जातच हे दोघेही बेशुद्ध पडले. काही वेळानंतर ही बाब तेथील सिक्युरिटी गार्डच्या लक्षात आली. त्याने आरडाओरड करून सर्वाना गोळा केले व त्यांना बाहेर काढण्यात आले. या चारही जणांना त्वरित वणीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत तपासणीनंतर गुड्डू व त्याच्या मामा राजकुमार यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर महादेव व बंडू हे उपचारानंतर काही वेळाने शुद्धीवर आले. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून त्यांना बघण्याकरिता गावकऱ्यांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
Leave A Reply

Your email address will not be published.