Video: पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जप्त केला अवैध दारूसाठा

सुमारे 15 पेट्या दारू जप्त, चार तास चालली कार्यवाही

0

दिलीप काकडे, घोन्सा: झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या येसापूर पोडावर वणी पोलिसांनी अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी नामदेव बाबाराव मडावी याला अटक करण्यात आली आहे. दुपारी 12.30च्या सुमारास पोलिसांनी येसापूर शेतशिवारात धाड टाकून अवैध दारूसाठा जप्त केला. पोलिसांनी 650 देशी दारूचे पव्वे जप्त केले असून 33,800 रुपये किमतीचा हा माल आहे. गेल्या दोन वर्षांपासून बाबाराव पोलिसांना गुंगारा देऊन अवैध दारूची विक्री करत होता.

घोन्सा परिसरात दारूला प्रतिबंध आहे. पोळ्याला लोक मोठ्या प्रमाणात दारू पितात. त्यामुळे नामदेव यानं मोठ्या प्रमाणात देशी दारूचा विक्रीसाठी साठा केला होता. येसापूर येथे अतिक्रमण केलेल्या शेतशिवारामध्ये त्यानं पहाटे दारू साठा लपवून ठेवला होता. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर दारूसाठा केल्याची टिप मुकुटबन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वणी पोलिसांनी दुपारी तिथं धाड टाकली.

नामदेवनं दारू शेतशिवारात लपवून ठेवल्यानं पोलिसांना दारूच्या पेट्या शोधण्यास चांगलेच कष्ट घ्यावे लागले. दुपारी 4 वाजेपर्यंत पोलिसांचं दारूसाठा शोधण्याचं काम सुरू होतं. या धाडीत पोलिसांनी सुमारे 15 पेट्या देशी दारू जप्त केली आहे. वणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात महेंद्र भुते, आशिष टेकाडे, रवी इसनकार आणि सहकारी यांनी ही कार्यवाही पार पाडली. घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे. येसापूर रामदास आत्राम, नागेश काकडे, सुभाष आत्राम तसंच येसापूर येथील गावक-यांनी त्यांना मदत केली.

आरोपी नामदेव मडावीची परिसरात दहशत
आरोपी नामदेव मडावीची परिसरात मोठी दहशत असल्याची माहिती मिळते. त्यानं केवळ अवैध दारू विक्रीतून मोठं घर आणि कार विकत घेतली आहे तसंच चांगली संपत्ती जमवली आहे. परिसरात नामदेव अवैधरित्या दारू विकतो याची माहिती होती. मात्र नामदेवचा दरार असा होता की त्यांच्याविरोधात कोणीही तक्रार द्यायला धजावत नव्हतं. जर कुणी पोलिसांना अवैध दारू विक्रीची माहिती दिल्यास तो त्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे त्याला घाबरून त्याच्याविरोधात कुणीही तक्रार करत नव्हतं.

(हे पण वाच: रक्तपेढीच्या मागणीसाठी लिहिलं रक्तानं निवेदन)

सध्या पोलिसांनी नामदेव मडावीला अटक केली असली तरी त्याची दहशत इतकी आहे की लोक अजूनही घाबरून आहे. त्याच्या दहशतीमुळे पोलिसांना पंचनाम्यावर सह्या करायला. तसंच त्यानं लपवलेला माल शोधायला अडचण जात होती. ही संपूर्ण वस्ती कोलाम पोड असल्यानं जेव्हा पोलीस त्याला पकडायला जायचे, तेव्हा तो कधी महिलांची ढाल करून तर कधी पोडावरील लोकांना धमकावून निसटून जायचा. मात्र आता पोलिसांनी त्याला अटक केल्यानं पोळा सण शांततेत पार पडेल अशी आशा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहे.

खाली क्लिक करून पाहा या घटनेचा व्हिडीओ

Leave A Reply

Your email address will not be published.