‘नाम’चा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
वणी व मारेगाव तालुक्यातील 56 कुटुबीयांना आर्थिक मदत
जितेंद्र कोठारी, वणी: नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनतर्फे वणी व मारेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबीयांना 25 हजारांची मदत करण्यात आली. वणीतील धनोजे कुणबी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी 56 लाभार्थी महिलांना मदतीचा धनादेश वाटप करण्यात आला. य.जि.म.बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांच्या तर्फे महिलांना साडी चोळी देऊन सांत्वन करण्यात आले. कार्यक्रमात ‘नाम’चे विदर्भ व खानदेश समन्वयक हरीश इथापे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला डॉ. शरद जवळे, दिलीप अलोणे, रामकृष्ण महल्ले, राजेश पुरी, नितीन पवार, धीरज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना धनादेश वाटप करण्यात आले. मान्यवरांनी शेतक-यांनी आत्महत्येसारखे पाउल उचलू नये अशी विनंती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तर धीरज भोयर यांनी यापुढेही नाम फाउंडेशन मदतीसाठी तत्पर राहील अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे संचालन स्वाती ठेंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाम फाउंडेशनचे सचिन साकरकर, राजेश पाहापळे, संजय पेचे, मुरलीधर भोयर, राधा दरेकर, कुणाल नागमोते इत्यादींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने वणी व मारेगाव येथील व्यक्ती उपस्थित होते.
नाम फाउंडेशन नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली एक संस्था आहे. ही संस्था ही शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर तसेच पाणी, पर्यावरण इत्यादींवर कार्य करते. यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या 389 कुटुंबांना नाम फाउंडेशनने आर्थिक मदत केली असून यात वणी व मारेगाव तालुक्यातील 56 कुटुंबाचा समावेश होता.
हे देखील वाचा:
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुडीपाडवा स्पेशल ‘ठंडा ठंडा कुल कुल’ ऑफर
Comments are closed.