वणी येथील रेती तस्करावर वरोरा ठाण्यात गुन्हा दाखल

करंजी रेती घाटातून अवैधरित्या रेती उपसा करताना महसुल विभागाची धाड... कारवाई पथकाला धक्काबुक्की करुन बोट व पोकलॅन मशीन पळविली

जितेंद्र कोठारी, वणी: वर्धा नदीवरील करंजी रेती घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्करांवर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये वणी येथील एका रेती तस्कराचाही समावेश आहे. कारवाई करणाऱ्या महसूल पथकासोबत धक्काबुक्की व बळजबरीने मशिनी पळवून नेल्या प्रकरणी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. वरोरा पोलिसांचा एक पथक पळून गेलेले आरोपी व माल जप्त करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे.

वर्धा नदीवरील वरोरा तालुक्याच्या हद्दीत करंजी घाटावरून पोकलेनच्या साहाय्याने तसेच नदीमध्ये बोटी लावून सेक्शन पाईपच्या द्वारे नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करीत असल्याची माहिती वरोरा महसूल विभागाला मिळाली. माहितीवरून महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने सोमवार 2 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान करंजी रेती घाटावर धाड टाकली.

या छाप्यात 1 पोकलॅन मशीन व 4 इंजिन बोटच्या साहाय्याने नदीच्या मधोमध अनेक फूट खोळीतून रेती उपसा करताना तसेच नदी किनाऱ्यावर रेतीचे ढिगारे तहसीलदारांना आढळले. जप्तीची कारवाई दरम्यान रेती तस्करांनी महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली तसेच धमकी देत बळजबरीने नदीच्या मार्गाने बोटी व मशीन पळवून नेल्या. या कारवाईत 60 लाख रुपयांची तब्बल 2 हजार ब्रास रेती अवैधरित्या उपसा केल्याचे पथकाला आढळले.

अवैधरित्या रेती चोरी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तहसीलदाराच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी प्रवीण महाजन रा. यवतमाळ, सुरेश कुंडलिकराव धाले, संजय सपाट रा. रासा ता. वणी, सचिन उमाकांत दरणे रा. हिवरा व इतर पाच-सहा जणंविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपीना पकडण्यासाठी वरोरा पोलिसांचा पथक यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. वरोरा महसूल विभागाच्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

हे देखील वाचा: 

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

मजुरांना चिरडणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

Comments are closed.