भंगाराला सोन्याचं भाव ! चोरट्यांचा निशाण्यावर बांधकाम साहित्य
सैंटरिंग प्लेट, जॅक, सळ्या, वाहनाचे पार्टस, शेतातील मोटर चोरीच्या घटने वाढ
जितेंद्र कोठारी, वणी : सध्या भंगाराला सोन्याचा भाव आला आहे. चढ्या भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून वणी परिसरात लोखंड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यानी आता आपला मोर्चा बांधकाम साहित्याकडे वळविला आहे. बांधकाम साईटवरून लोखंडी सळ्या, सैंटरिंग प्लेट्स, लोखंडी जॅक चोरी करून परिसरातील भंगार व्यावसायिकांना विकण्याचा सपाटा या चोरट्यानी सुरु केला आहे.
जानेवारी 2022 नंतर लोखंडचे भाव दुप्पट झाले आहे. पूर्वी 4 हजार रुपये टन मिळणारी लोखंडी सळई आता 8 हजार ते 8 हजार 500 रुपये टनच्या भावात बाजारात विकली जात आहे. लोखंडच्या भाववाढीमुळे भंगारच्या भावातही वृद्धी झाली. 18 ते 20 रुपये किलो भावाचे भंगार थेट 42 ते 45 रुपयावर जाऊन भिडले. त्यामुळे भंगार चोरट्याना सुगीचे दिवस आले.
वणी शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात घर, गोडाऊन, कारखाने, सिमेंट रस्ते, पुलाचे कामे सुरु आहे. मागील काही दिवसांत बांधकाम साईटवरून लोखंडी सळई, सैंटरिंग प्लेट्स, जॅक चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी लोखंड चोरीची तक्रार पोलिसांत करण्यात आली तर बहुतांश चोरीच्या घटनेची तक्रारच नोंदविण्यात आली नसल्याची माहिती आहे.
वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा व दगडाच्या खाणी आहे. त्यामुळे या भागात ट्रक, हायवा, जेसीबी, लोडर मशीन व इतर वाहनांची संख्या मुबलक आहे. उभ्या वाहनातून रात्रीच्या वेळी बॅटरी, जॅक, स्टेपनी व पार्टस चोरी करण्याची मजल भंगार चोरट्यानी मारली आहे. भालर मार्गावर बंद पडलेली ऑइल कंपनीतुन करोडो रुपयांचा भंगार चोरट्यानी साफ केला. चोरट्यांकडून खरेदी केलेल्या लोखंडी भंगाराच्या भरवशावर काही होलसेल भंगार विक्रेते गब्बर झाले आहे.
वणी परिसरातील शेतातून पाण्याची मोटर व केबल चोरीच्या अनेक घटना घडल्या असताना पोलिसांना आजपावेतो चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळालं नाही. नुकतेच मुकूटबन पोलिसांनी चोरीचे भंगार घेऊन जाणारी एक मारुती 800 कार पाठलाग करुन पकडली. मात्र चोरटे कार सोडून पसार होण्यास यशस्वी झाले. त्या कारमध्ये ब्रासची मोठी प्लेट व ट्रकचा रेडियटर पोलिसांना सापडला. मात्र सदर भंगार कुठून चोरण्यात आला व चोरटे कोण ? याचा शोध अद्याप लागलेला नाही.
Comments are closed.