जल पुनर्भरणासाठी वणीत नदी नांगरण्याचा उपक्रम

जलस्तर वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन

0
विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस पाण्याची निर्माण होत असलेली समस्या, जलपुनर्भरणाचा अभाव यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. त्यावर मात करण्यासाठी वणीत विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून वॉटर हार्वेस्टिंग सोबत जल पुनर्भरणासाठी येथील निर्गुडा नदी नांगरून टाकण्याचा उपक्रम तहसीलदार श्याम धनमने यांच्या मार्गदर्शनात मनीष कोंडावार व गजानन कासावार यांनी पुढाकार घेऊन येथील नदीचे पात्र नांगरून टाकले. 
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोमाई नदीच्या काठावरील डांबरखेडा येथे ही नदी नांगरून 500 फूट खोल गेलेला जलस्तर 90 फुटापर्यंत आणण्यात तेथील गावकऱ्यांना यश मिळाले होते. तेथून प्रेरणा घेऊन वणी शहरात होऊ घातलेल्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीने निर्गुडा नदीवर गणेशपूर येथील पुलापासून पाण्याशिवाय मोकळ्या असलेल्या नदीतील पात्र टॅक्टरने हा पूर्ण भाग नांगरून टाकण्यात आला आहे. या नदीच्या अर्ध्या पात्रात अनेक महिन्यापासून नदीला प्रवाहित पाणी नसतांना पाणी जमिनीत न झिरपता तसेच साचून आहे.
पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून चार महिने वाहते. वाहून जाणारे जाणारे पाणी या द्वारे किती जमिनीत मुरते हे पाहून पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सोबत येथील नगर वाचनालयात, एस.पी.एम. विद्यालय, गणेशपूर येथील निर्मल नगरी मध्ये पाण्याचा जलस्तर वाढविण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविण्यात आला. नदी नांगरणी  प्रसंगी गणेशपूरचे सरपंच तेजराज बोढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह किरण बुजोने व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.