कर्जमुक्ती नव्हे, तर कर्जच नाही… डॉ. लोढांचा अनोखा उपक्रम

वरपोड येथे शेतक-यांना बि-बियाणं व शेतीउपयोगी साहित्याचं वाटप

0
निकेश जिलठे, वणी: वरपोड येथे रविवारी दिनांक 16 जून रोजी शेतक-यांना बि-बियाणं, खत, शेतीपयोगी अवजारं यांचं वाटप करण्यात आलं. गावातील  एकही शेतकरी कुटुंब या मदतीपासून वंचित राहिलं नाही. सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या तीन वर्षांपासून या गावात बि-बियाणं व शेतीपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत आहे. याचा फायदा असा झाला की संपूर्ण गाव कर्जमुक्त झालं असून त्याची सावकारी पाशातून सुटका झाली आहे.
शेतक-यांना बियांणांचे वाटप करताना डॉ. महेंद्र लोढा
वरपोड हे झरी तालुक्यातील एक आदिवासी पोड. शंभर ते सव्वाशे लोकवस्तीचं हे गाव आहे. चार वर्षांआधी डॉ. महेंद्र लोढा यांनी हे गाव दत्तक घेतलं. या गावात कोणतीही सोयीसुविधा नव्हती. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, रोजगार अशा मुलभूत सुविधांपासून हे गाव कोसो दूर होतं. पाण्यासाठी तर गावातील महिलांना डोंगर उतरून पाणी आणावं लागायचं. दत्तक घेतल्यानंतर या गावात आधी मूलभूत प्रश्न सोडवण्यात आले. डॉ. लोढा यांच्या पुढाकारातून आणि गावक-यांच्या श्रमदानातून इथे रस्ते तयार करण्यात आले. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली करण्यात आल्या. मुलांना शिक्षणासाठी अंगणवाडी सुरू करण्यात आली. गावात पिठाची गिरणी नसल्याने पिठाची गिरणीही सुरू करण्यात आली. वनविभागाच्या योजनेद्वारे घरोघरी गॅस सिलिंडर देण्यात आले.
डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून गावाची तर सुधारणा झाली होती. मात्र इथला शेतक-यांची परिस्थिती जैसे थे होती. इथला शेतकरी बि बियाणं विकत घेण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यायचा. त्यात त्याला दामदुप्पट भावाने कर्ज दिले जायचे. सोबतच सावकार जे बि बियाणं द्यायचा ते निकृष्ट व बोगस बियाणे असायचे. त्यामुळे वर्षभर श्रम करून ही शेतक-यांच्या हाती व्याज, कर्ज फेडून हजार दोन रुपयेही उरायचे नाही. गावातील शेतकरी सावकाराच्या पाशात अडकल्याने त्याची आर्थिक प्रगती खुंटली हे लक्षात येताच डॉ. लोढा यांनी शेतक-यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचं ठरवलं.

तीन वर्षांआधी इथे पहिल्यांदा शेतक-यांना उच्च प्रतिचे बि-बियाणं व खत वाटप करण्यात आले. शेतक-यांना अवजारं तसेच फवारणीसाठी औषधाचं वाटप करण्यात आलं. यात वणीतील भरत ठाकूर तसेच काही दानशूर लोकही सहभागी झाले. याचा परिणाम असा झाला की शेतक-यांना पहिल्याच वर्षी भरगोस पीक आले. प्रत्येक शेतक-यांचा कापूस गावातच मोजून तो ट्रॅक्टरने जिनिंगमध्ये पाठवण्यात आला. ज्या दिवशी कापसाला जादा भाव असेल त्या दिवशी तो विकला गेला. त्यात बि-बियाणे, खत व औषधांचा खर्च वजा करण्यात आला व हा नफा शेतक-यांना देण्यात आला. हा नफा प्रत्येक शेतक-यांना जवळपास 20 ते 25 हजारांचा होता. आधी सावकारांकडून कर्ज घेतल्याने त्यावरील व्याजामुळे शेतक-यांना केवळ हजार दोन हजार रुपये उरायचे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी ती वर्षांआधी डॉ. लोढा व त्यांच्या सहका-यांनी प्रत्येकी 50 हजार रुपये पाच वर्षांसाठी गुंतवणूक म्हणून घेतले व त्या पैशातून पहिल्या वर्षी शेतक-यांसाठी बि-बियाण व शेतीपयोगी साहित्य घेतलं. प्रत्येक शेतक-यांना हे साहित्य आवश्यकतेनुसार वाटप करण्यात आलं. उत्कृष्ट बि-बियाणं व शेतक-यांच्या परिश्रमामुळे कापसाचं भरगोस पीक आलं. शेतीला लागलेला खर्च वजा करून राहिलेला नफा शेतक-यांना वाटला. पुढील वर्षी त्याच पैशातून पुन्हा हा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे शेतक-यांना कुठल्याही सावकाराच्या दारात जावं लागलं नाही, कुठलंही व्याज द्यावं लागलं नाही. उत्कृष्ट बि-बियाणं व खतं शेतक-यांना भेटले. तसेच त्यांचा कापूस त्या वर्षीच्या चढ्या किमतीत विकण्यात आला. परिणामी वरपोड गावातील प्रत्येक शेतक-याची आर्थिक विवंचणेतून व सावकारी पाशातून कायमची मुक्तता झाली. होणा-या आर्थिक फायद्यामुळे इथल्या शेतक-यांच्या मुला मुलींचे आर्थिक विवंचणेमुळे रखडलेले लग्न, मुलांचे शिक्षण, घरावर छप्पर या समस्या सुटल्या.
कापूस मोजताना आणि जिनिंगमध्ये पाठवताना शेतकरी
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला प्रयोग याही वर्षी करण्यात आला. रविवारी दुपारी तीन वाजता वणीतून डॉ. महेंद्र लोढा आणि त्यांचे सहकारी वरपोड गावी पोहोचले. तिथल्या शेतक-यांशी चर्चा करून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतक-यांना बि-बियाणं, खतं व अवजारांचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर लगेचत शेतात बियाणांची टोबणीही करण्यात आली. निसर्गाची साथ आणि परिश्रम याच्या साथीने यावर्षीही भरगोस पीक घेऊ अशी ग्वाही उपस्थित शेतक-यांनी डॉ. लोढा यांना दिली.
100 गावांना दत्तक घेऊन सावकारी पाशातुन मुक्त करण्याचे ध्येय- डॉ. लोढा
केवळ एका गावाची समस्या सुटली असली तरी इथे इतर सर्वच खेड्यावरची व पोडावरची परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे पुढल्या वर्षी 100 गाव दत्तक घेऊन या गावासाठी एक शेतकरी बँक सुरू करण्याचे ध्येय आहे. या बँकेत शेतक-यांचेच शिकलेले मुलं नोकरीला असणार. ही बँकच शेतक-यांना बि-बियाणं, खतं, औषधी पुरवणार. शिवाय परिसरातच एक जिनिंग भाड्याने घेऊन शेतक-यांचा कापूस तिथे पाठवून त्यांची लूट थांबवली जाईल. याद्वारे शेतक-यांना कर्जमुक्त करून शेतक-यांना आर्थिक संपन्न करण्याचे ध्येय आहे. सोबतच सामुहिक शेतीचा प्रयोगही येत्या दोन वर्षांत या गावात करण्यात येईल. 
Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!