फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल
खोटा सर्च रिपोर्ट तयार करणा-या वणीतील वकिलावरही गुन्हा दाखल
वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या गणेशपूर येथील आर्यन कंस्ट्रक्शन कंपनीच्या भागीदारांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका नामवंत व्यावसायिकाची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नामवंत वकीलाला हाताशी धरून बिल्डर दाम्पत्यासह सर्च रिपोर्ट देणा-या वकीलावरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील छोरिया लेआउटमध्ये आर्यन कंस्ट्रक्शन कंपनीनं 6 प्लॉट एकत्र करून 7 हजार, 922 चौरस फूट जागेवर सदनिकांचे बांधकाम केले. यातील 301 क्रमांकाची सदनिका संजय मारोतराव दहेकर या व्यावसाईकाला 6 लाख 50 हजार रूपयात विकत देण्याचा करार करण्यात आला होता. त्यानुसार 17 जानेवारी 2013 रोजी सदर सदनिकेची नोंदणी करून आर्यन कंस्ट्रक्शन कंपनीचे भागीदार योगेश प्रभाकर पंजाबी आणि रचना योगेश पंजाबी यांनी नोंदणी कार्यालयात खरेदीपत्र करून दिलं.
सदनिका विकत घेण्यासाठी संजय दहेकर यांचेकडे पुरेशी रक्कम जुळत नव्हती. ही बाब त्यांनी योगेश पंजाबी यांना सांगितली. त्यावर योगेष पंजाबी यांनी शहरातील विदर्भ मर्चंट को-ऑप अर्बन बँकेत चांगले संबध असल्यासचं सांगत दहेकर यांना ते बँकेत घेऊन गेले. त्यानंतर बॅंकेनं सदर मालमत्तेचा सर्च रिपोर्ट आणण्यासाठी सांगितलं. अॅड. निलेश चौधरी हे या बॅंकेच्या मंडळावर कायदेशिर सल्लागार म्हणून आहे. त्यांच्यांशी चांगले संबध आहे असे योगेश पंजाबी यांनी दहेकरांना सांगितलं व त्यांना ते चौधरी यांच्याकडे घेऊन गेले.
सदनिकेचे दस्ताऐवज अॅड निलेष चैधरी यांनी बघून सदर सदनिकेवर कोणताही बोजा नसल्याचं सांगून व्यवहार करण्यास काही हरकत नसल्याचं सांगितलं. त्यासाठी मी स्वतः सर्च रिपोर्ट तयार करून देतो असं ही त्यांनी सांगितलं. अॅड. चौधरीवर विश्वास ठेवून संजय दहेकर यांनी सदनिकेची सर्वच मूळ दस्ताऐवज त्यांचेकडे दिली. त्यावरून अॅड निलेश चैधरी यांनी सदनिका क्रमांक 301 या मालमत्तेवर कोणताही बोजा नसल्याचा सर्च अहवाल तयार करून दिला.
सर्च रिपोर्ट तयार करून दिल्यावर बॅंकेनं कर्ज मंजूर केलं तसंच सदर मालमत्तेचे मूळ दस्ताऐवज गहाण स्वरूपात ठेवून घेतले. दरम्यान गणेशपूर येथील आर्यन कंस्ट्रक्शन कंपनीचे भागीदार योगेश पंजाबी, रचना पंजाबी यांनी बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून रंगनाथ स्वामी पतसंस्थेची फसवूणक केल्याची बातमी वृत्तपत्रामधून प्रकाशित झाली. त्यामुळे संजय दहेकरला त्यांच्याविषयी संशय आला. त्यांनी लगेच पतसंस्था गाठून यासंबधीची माहिती घेतली असता त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी खरेदी केलेली सदनिका रंगनाथ स्वामी पतसंस्थेला गहाण असल्याचं त्यांना कळलं. तसेच आर्यन मिडास या सदनिकांवर 30 लाख रूपयांचं कर्ज रंगनाथ स्वामी पतसंस्थेकडून उचल केल्याचंही त्यांना समजलं.
(कायर परिसरात राजरोसपणे अवैध मटका सुरू)
फसवणूक झाल्याचं कळताच सदर मालमत्तेचा खोटा सर्च अहवाल तयार करून देणारे अॅड निलेश चौधरी आणि बिल्डर्स योगेश पंजाबी व रचना पंजाबी यांच्याविरोधात दहेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यांच्याविरोधात कलम 420, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघेही आरोप फरार असल्याचं समजते. तर चौधरी यांनी पांढरकवडा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.