सुशील ओझा, झरी: विनयभंगाचा आरोप असलेल्या एका आरोपीस न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पितांबर प्रेमानंद सिडाम असे या आरोपीचे नाव असून तो अहेरअल्ली इथला रहिवाशी आहे. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे.
तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन हद्दीतील अहेरअल्ली येथील पीडित महिला ४ डिसेंबर २०१६ रोजी कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी आरोपी पितांबर प्रेमानंद सिडाम याने पीडितेचा विनयभंग केला. याबाबत पाटण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. जमादार सुरेश येलपुलवार यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले.
सदर प्रकरणात साक्षदार तपासण्यात आले. त्यात आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्याय दंडाधिकारी प्रथमश्रेणी के. जी. मेंढे यांनी आरोपीला एक वर्ष कारावास व १ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने साहाय्यक सरकारी वकील पी. डी. कपूर व कोर्ट पैरवी अधिकारी उमेश डोंगरे यांनी काम पाहिले.