उद्या वणीत बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या समस्येविरोधात विराट मोर्चा
शासकिय मैदानावरून निघणार मोर्चा
विवेक तोटेवार, वणी: शेतकरी व युवकांच्या समस्येविरोधात वणीत उद्या 18 जानेवारी शुक्रवारला ‘युवा शक्ती’ द्वारे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा वणीतील शासकीय मैदानावरून निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व ऍड सूरज महारतळे करणार आहेत. मोर्चानंतर याबाबतचे एक निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना ऍड सूरज महारतळे म्हणाले की प्रत्येक सरकार निवडणुका जवळ आल्या की शेतकरी व युवकांच्या समस्या उचलून धरते. परंतु सत्तेत येताच ते या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आता युवा शक्तीद्वारे कोणतेही राजकारण न करता फक्त सामाजिक भावनेतून हा मुद्दा उचलण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
या मोर्चात सरकारी नोकरीत तरुणांना समाविष्ठ करावे, तरुणांना व्यवसायासाठी बँकेतून विनातारण कर्ज द्यावे. बेरोजगारांना जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत मासिक 10000 रुपये बेरोजगारी भत्ता द्यावा. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा. अशा यात प्रमुख मागण्या आहेत.
या मोर्चात बेरोजगार तरुणांनी व शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सूरज महातराळे व युवा शक्तीद्वारे करण्यात आले. शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत सूरज महारतळे यांच्यासह युवा शक्तीचे अध्यक्ष रवी ढेंगळे, उपाध्यक्ष नितीन तुराणकर, सचिव गिरीश कुबडे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.