निकेश जिलठे, वणी: कॅन्सर हा रोगावर उपचार नाही. हा रोग झालेल्या व्यक्तींचा लवकरात लवकर मृत्यू होतो. अशी लोकांची चुकीची धारणा आहे. कॅन्सर 100 टक्के बरा होऊ शकतो. फक्त या रोगाचे योग्य वेळी निदान होणे व यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटचे डॉ. नितीन बोमनवार यांनी केले. वणीतील एसबी हॉल येथे शनिवारी ‘कॅन्सर रोगापासून कसे वाचता येईल’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की जीवनशैली, खाण्यापिण्यात बदल तसेच व्यसन यामुळे कॅन्सरची आजार होऊ शकतो. नवीन पिढीत कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. या पासून वाचण्यासाठी व्यसनांपासून दूर राहावं लागेल तसेच बदलती जीवनशैली आणि खाण्यापीण्याच्या सवयीत बदल करणे गरजेचे आहे.
ड
मार्गदर्शन शिबिराचे दुसरे व्याख्याते अमेरिकन ऑन्कोल़ॉजी इन्स्टिट्यूटचे डॉ. नरेश जाधव हे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही. या रोगाबद्दल अनेक नकारार्थी गोष्टी लोकांमध्ये आहेत. कॅन्सर हा रोग शहरवाल्यांचा, श्रीमंतांचा आहे अशी चुकीची धारणा लोकांमध्ये आहे. मात्र असं काहीही नाही. हा रोग कुणालाही होऊ शकतो. फक्त गावखेड्यातील माणूस दवाखान्यात उपचारासाठी पोहोचत नसल्याने त्याचे निदान होत नाही, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना डॉ जाधव म्हणाले की भारतात पुरुषांमध्ये तोंड, जबडा व गळ्याचा कॅन्सर तसेच महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. महिला स्तनाच्या कॅन्सरची प्राथमिक चाचणी स्वतःच करू शकते. जर महिलांच्या छातीत गाठ असल्यास ती वैद्यकीय चाचणी करून निदान करू शकते. अशी गाठ आढळल्यास ती त्वरित डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करू शकते. हा रोग अनुवांशिक आहे. विषयी 30 वर्षांनंतर वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते, असे ही ते म्हणाले. गर्भाशयाचा कॅन्सर व स्तनांच्या कॅन्सरसाठी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.
व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष वणीतील वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. आर डी देशपांडे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष व उद्योजक नरेंद्र नगरवाला होते. यावेळी कॅन्सर या रोगावर यशस्वी मात करून इतरांना प्रेरणा देणारे प्रा. क्षितिज फुलाडी यांचा कँसरबाबत जनजागृती करण्याच्या कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक क्षितिज फुलाडी म्हणाले की कॅन्सर झाल्याचे कळताच रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक खचून जातात. आता रुग्ण लवकरच गचकणार या नकारार्थी मानसिकतेमुळे रुग्ण अर्धा खचतो. सकारात्मक मानसिकता ठेवल्यास या रोगावर सहज मात केली जाऊ शकते. आज केवळ जीवनाकडे सकारात्मक पाहण्याच्या दृष्टीकुणामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. कुणाला कॅन्सरबाबत काही मदत हवी असल्यास माझ्या घराचे दरवाजे कायम उघडे आहे. यासाठी तुमची फक्त एक स्माईल हीच माझी फिस आहे, असेही ते म्हणाले. मान्यवरांच्या व्याख्यानानंतर प्रश्न उत्तरांचा तास झाला. यात उपस्थितांच्या विविध प्रश्नांना आणि समस्येवर मार्गदर्शकांनी उत्तरे आणि सल्ला दिला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीकर हजर होते. हा कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर असोसिएशन वणी व जैन सोशल ऑर्गानायझेशन वणी द्वारा करण्यात आले. तर कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. महेंद्र लोढा होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेएसओ व डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. संध्याकाळी रात्री 8.30 वा. परिसरातील डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नितीन बोमनवार व डॉ. नरेश जाधव यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केलेे.
कॅन्सर रोगनिदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
व्य़ाख्यानाच्या कार्यक्रमाआधी दुपारी 11 ते 3 पर्यंत कॅन्सर रोगनिदान शिबिर झाले. वणीतील लोढा हॉस्पिटल इथे हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे कॅन्सरवर मात करणाऱ्या एका महिलेच्या हातून फित कापून उद्घाटन करण्यात आले. कॅन्सर तज्ज्ञांद्वारे यावेळी रुग्णांची तपासणी करण्यात आली. आवश्यक तपासणीसाठी नागपूरहून अत्याधुनिक मशिन मागवण्यात आल्या होत्या. शिबिरात सुमारे 250 रुग्णांनी तपासणी केली. तपासणीमध्ये काही पेंशंटला आधीच कॅन्सरची माहिती असल्याचे आढळून आले, मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. या शिबिरात ज्या रुग्णांमध्ये कॅन्सरचे निदान आधळून आले आहेत अशा रुग्णांना लोढा हॉस्पिटलच्यावतीने शासनाच्या योजनेत बसवून मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.