बहुगुणी डेस्क, वणी: येथील नगर परिषद वणी तर्फे दि. 21 जानेवारी पासून आंतर शालेय क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पाच दिवस रंगणार आहे. येथील बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र. 3 वणी मध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दि. 21 ते 25 जानेवारी दरम्यान होणार आहे.
सोमवारी दि. 21 जानेवारीला महोत्सवाचे रितसर उदघाटन होणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे करणार असून अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन झाल्यानंतर येथील शासकीय मैदानावर वैयक्तिक स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर रात्री नगर परिषदेच्या सर्व शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत हे करणार आहेत. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित राहणार आहेत.
दि. 22 ते 25 जानेवारी दरम्यान क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर बक्षीस वितरण तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते दि. 25 जानेवारीला होणार आहे. या प्रसंगी अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिनकरराव पावडे, जिल्हा खनिज विकास समितीचे सदस्य विजय पिदूरकर राहणार आहेत.
या सोबत तालुका क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, शिक्षण सभापती रंजुताई झाडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती मायाताई ढुरके, बांधकाम सभापती राकेश बुग्गेवार, आरोग्य सभापती शालीक उरकुडे, जलपूर्ती सभापती प्रीतिताई बिडकर व सन्माननीय नगर परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या कला व क्रीडा महोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय पवार, आयोजक शाळेच्या मुख्याध्यापक उमाताई राजगडकर, क्रीडा महोत्सवाचे सचिव प्रमोद जोगी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय परचाके, उपसचिव दिलीप कोरपेनवार, सहसचिव अविनाश पालवे यांनी केले आहे.