वणीत नगर परिषद अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन
नगर पालिकेचा 12 कोटींच्या विकास कामांचा धडाका
विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ फेब्रुवारी रविवारला विविध प्रभागातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे. वणीतील विविध प्रभागातील सदर कामाच्या ठिकाणी संध्याकाळी भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. सदर भूमिपूजन सोहळ्याचे उद्दघाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते तर विशेष अतिथी म्हणून वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित होते. सुमारे 12 कोटींच्या निधीचे हे काम आहेत.
भूमिपूजनाची सुरूवात वणी शहरातील प्रभाग क्र. १ मधल्या नांदेपेरा रोड ते वरोरा (रेल्वे स्टेशन पर्यंत) १२ मीटर डीपी रोडच्या कामाच्या भूमिपूजनाने झाली. त्यानंतर प्रभाग 1 मध्ये बस स्टँड ते पुराणीक यांच्या घरापर्यंत तसेच पुराणीक यांच्या घरापासून ते डीपी रोड पर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. प्रभाग क्र. ३ मधील वरोरा रोड साईबाबा दरबार ते घुगूस रोडवरील टोल नाक्या पर्यंत डीपी रोडच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रभाग क्र. ८ मधील खाती चौक ते तुटी कमान पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रभाग क्र.१३ मधील दीपक टॉकीज ते जंगली पीरबाबा दर्ग्या पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ६ मधील काठेड चौक ते सावरकर चौक, प्रभाग क्र. १० मधील गंगशेट्टीवार ते गोरंटीवार यांच्या घरापर्यंत पाईप ड्रेनचे बांधकाम करणे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंपोस्ट डेपोवर विविध कामे करणे, जत्रा मैदानावरील मटण मार्केटमध्ये स्टॉलर हाऊसचे काम, अग्निशमन कर्मचारी निवारा बांधकाम यासह गणेशपूर मार्गावरील नेहरू बगीचा विकास करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विविध विकास कामांच्या भूमिपूजनाबाबत आनंद व्यक्त केला. शासनाने मोठी शहरे, गावांचा विकास करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. वणी नगरपालिकेने विकासकामांचा जो धडाखा लावला आहे ही वणीकरांसाठी आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे. भविष्यातही वणीचा विकास कसा करता येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार असे प्रतिपादन हंसराज अहिर यांनी केले.
वणीला मिळणार अत्याधुनिक बगिचा
भूमिपूजनाच्या वेळी वणीकरांचे अत्याधुनिक बगिच्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली. नेहरु पार्क हा गणेशपूर रोडवर असणारा वणीतील सर्वात जुना आणि मोठा बगिचा आहे. या बागेत अत्याधुनिक ओपन जिम, हायमॅक्स, कारंजे, अत्याधुनिक खेळणे इत्यादी बसवण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.
कार्यक्रमाला नगर परिषदचे मुख्याधिकारी संदीप बोरकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदूरकर, शहर अध्यक्ष रवि बेलूरकर, प्रदेश सदस्य विजय चोरडिया, पंचायत समिती उपसभापती संजय पिंपळशेंडे, नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, न.प. आरोग्य सभापती शालीक उरकुडे, बांधकाम सभापती राकेश बुग्गेवार यांच्यासह नगर परिषदचे सर्व सदस्य, स्थायी समितीचे सदस्य यांच्यासह नामनिर्देशीत सदस्य महादेव खाडे, चंद्रकांत फेरवानी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
.