बहुगुणी डेस्क, वणी: जैताई देवस्थान वणी शिक्षण समिती द्वारा दर वर्षी पू. मामा क्षीरसागर स्मृती दिनी दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार या वर्षी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिषद शाळा क्र. 5 चे मुख्याध्यापक गजानन कासावार ह्यांना दिला जाणार असल्याचे एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला व सचिव माधव सरपटवार ह्यांनी जाहीर केले आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप 2500 रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल व श्रीफळ असे आहे.
कासावार ह्यांना पुरस्कार दि. 6 एप्रिल 2019 शनिवार रोजी रात्री 7.30 वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात समारंभपूर्वक दिला जाणार आहे. पुरस्कार 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. रमाकांत कोलते यांच्या हस्ते दिला जाणार आहे.या प्रसंगी डाॅ. कोलते ‘शिक्षक : एक उर्जास्त्रोत ‘ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.
कासावार यांची ज्ञाननिष्ठा , विद्यार्थीनिष्ठा व समाजनिष्ठा लक्षात घेऊन मंदिराने हा पुरस्कार त्यांना देण्याचे ठरविले आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक संस्थेने केली आहे.