गोवा मुक्ती संग्राम सैनिक प्रल्हादपंत रेभे कालवश

रविवार, 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार

0

अशोक आकुलवर, (विशेष प्रतिनिधी) वणी : येथील गोवा मुक्ती संग्राम सैनिक तथा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादपंत कृष्णराव रेभे यांचे शुक्रवार 29 मार्च रोजी मध्यरात्री 12.30 वाजता निधन झाले. मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते. त्यांच्यावर उदया रविवारी 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. 

मूळचे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील असलेले प्रल्हादपंत रेभे आपले वडील कृष्णराव रेभे व आजोबा आत्मारामजी रेभे यांच्यासोबत व्यवसायानिमित्त वणी येथे आले. त्यावेळी त्यांचे वय 12 वर्षाचे होते. सुरवातीच्या काळात रेभे परिवार वाणीजवळील निळापूर या छोट्या खेड्यात  वास्तव्याला होते. त्यानंतर  हा परिवार वणी येथे स्थाईक झाला.  बालपणापासूनच प्रल्हादपंतांना परकीय सत्तेची चीड होती. त्यांच्यावर महात्मा गांधींचा व त्यांच्या सत्य व अहिंसा या तत्वांचा विशेष प्रभाव होता. ते सुरवातीपासूनच स्वातंत्र्य आंदोलनाशी जुळले होते. महात्मा गांधींच्या चले जावं आंदोलनाचाही त्यांच्या बालमनावर प्रभाव पडला होता.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य बहाल केले असले तरीही गोवा, दमण व दिव हे पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आहे ही बाब पंचवीशीतल्या तरुण प्रल्हादपंताना सातत्याने सलत होती. जेव्हा शिवाजी मराठे यांनी गोवा मुक्तीसाठी महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन केले तेव्हा त्या आवाहनाला प्रल्हादपंतानीसुद्धा प्रतिसाद देऊन थेट बेळगाव गाठले. तेथे त्यांची भेट शिवाजी मराठे यांच्यासह  मधू दंडवते यांच्यासोबतसुद्धा झाली.

गोवा मुक्त झालाच पाहिजे या सार्थ प्रेरणेने पेटून उठलेल्या त्या तरुणांच्या जथ्याने सावंतवाडी मार्गे अरोण्डा गाठले. तो दिवस होता 17 ऑगस्ट 1955. गोवा मुक्ती आंदोलकांच्या ललकारीने  चिडून उठलेल्या पोर्तुगीज लष्कराने या निशस्त्र सत्याग्रहींवर अमानुष लाठीहल्ला केला. शिवाजी मराठेसोबत पुढे असलेल्या प्रल्हादपंतावरही साहजिकच निर्दयी लाठ्या बरसल्या. त्यांच्या डोक्याला व हाताला जबर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत प्रल्हादपंत खाली कोसळले. त्यांच्या शरीरावर इतरही काही सत्याग्रही जखमी होऊन कोसळले. देशप्रेमाने पेटलेल्या प्रल्हादपंतांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. स्वयंसेवकांनी प्रल्हादपंतासोबत इतर जखमी सत्याग्रहीना सावंतवाडीच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविले. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा जेव्हा 435 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला तेव्हा प्रल्हादपंतानी आनंदाने इतर सत्याग्रहींसोबत जल्लोष साजरा केला होता.

त्यानंतर प्रल्हादपंत स्वस्थ बसले नाही. त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांचा अनेक सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध होता. अनेक सामाजिक कार्याचे ते आश्रयदाते होते.त्यांच्या कार्याची केंद्र व राज्य सरकारनेसुद्धा दखल घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते 26 जुलै 1987 रोजी त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. चले जावं आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 9 ऑगस्ट 2017 रोजी क्रांतिदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या सचिव आभा शुक्ला व अतिरिक्त आयुक्त लोकेश चंद्र उपस्थित होते.  त्यांना पुण्यभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

गोवा मुक्ती सैनिकांची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहून ते नेहमी हळहळ व्यक्त करीत. मुक्ती सैनिकांना राज्यशासन योग्य ती पेंशन अदा करीत नाहीत हे  पाहुन प्रल्हादपंतांनी  गोवा मुक्ती सैनिक संघाचे अध्यक्ष या नात्याने थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने गोवा मुक्ती सैनिकांना थकबाकीसह पेंशन अदा करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले. मृत्यूशय्येवर असलेल्या प्रल्हादपंतांना मागील आठवड्यात या संघटनेचे सचिव गणपतरावजी गभने यांनी या बाबतीत दूरध्वनिवरून त्यांना माहिती दिली. तेव्हा त्यांच्या वृद्ध पण करारी चेहऱ्यावर कृतार्थतेचे स्मित झळकलेले अनेकांनी पाहीले.

प्रल्हादपंत हे अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचे केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून सध्या काम पाहत होते. प्रल्हादपंत रेभे यांच्या मागे त्यांचे कनिष्ठ बंधू बाबुराव रेभे, दिलीप, संजय, अनिल, जयेश व रवी ही पाच मुले तथा सौ पुष्पा विलास टेटे व सौ सोनाली प्रशांत गुरव हया दोन कन्या आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या या निधनाने एका सळसळत्या तारुण्याचा अस्त झाल्याची भावना वणीकरांमध्ये आहे

.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.