अशोक आकुलवार, (विशेष प्रतिनिधी) वणी: लोकसभेची ही निवडणूक देशाची सुरक्षा, स्वाभिमान, अभिमान व विकास कुणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. विकास कामात भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने निधीची कमतरता भासू दिली नाही. विकास करताना माझा (भाजपचा) आवाज दाबण्याची कुणाचीही ताकद नसल्याची सिंहगर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज गुरूवारी चार एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजता वणी येथील शासकीय मैदानावर आयोजित हंसराज अहिर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हंसराज अहिर, राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, खा. विकास महात्मे, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, भाजप-सेना व रिपाइं (आ) चे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा जाहीरनामा म्हणजे निव्वळ मतदारांना एप्रिल फूल बनवण्याचा डाव आहे. काँग्रेसच्या मागील पंचावन्न वर्षांच्या राजवटीच्या तुलनेत मोदी सरकारने केलेल्या पाच वर्षांतील विकासाचे पारडे जड आहे. भारताचे तुकडे करणा-यांना खुली छुट मिळावी म्हणून काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे अभिवचन दिले आहे, असेही ते म्हणाले.
मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत केली असून भारतीय शेतक-यांच्या खात्यात पंचाहत्तर हजार कोटी रुपये जमा होत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. केंद्रात मंत्री असलेले नितीन गडकरी, हंसराज अहिर तसेच मुख्यमंत्री या नात्याने आपण आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मिळून विदर्भाच्या विकासाचा चेहरामोहरा बदलवीला असल्याचे त्यांनी यावेळी ठासून सांगितले.
‘चौकीदार शब्दाचा एकदाही उल्लेख नाही’
भाजप नेत्यांच्या प्रत्येक भाषणात ‘मै भी चौकीदार‘ व काँग्रेस नेत्यांच्या प्रत्येक भाषणात ‘देश का चौकीदार ही चोर है’ या वाक्यांवर सहसा जोर असतो आणि या वाक्याभोवतीच निवडणुकीची भाषणे केंद्रीत झालेली असतात; परंतु आजच्या या प्रचारसभेत फडणवीसांनी एकदाही ‘चौकीदार’ या शब्दाचा उल्लेख केला नाही. याउलट 1 एप्रिल रोजी वर्धा येथे झालेल्या नरेंद्र मोदीच्या जाहीर सभेत बोलताना फडणवीसांनी व्यासपीठावरील प्रत्येक नेत्याचा उल्लेख करताना त्यांच्या नावाआधी चौकीदार असा शब्दप्रयोग केला होता.
‘दुधवाला आणि दारूवाला’ ठरतोय निवडणुकीचा तकीया कलाम
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या प्रचारात ‘दुधवाला आणि दारूवाला’ हा तकीया कलाम प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. आजच्या सभेतही आपल्या भाषणाचा शेवट करताना या मतदारसंघाचे नेतृत्व दुधवाल्याने करावे की दारुवाल्याने करावे असा थेट सवाल समोरच्या गर्दीला फडणवीसांनी केला. त्यामुळे कधी नव्हे एवढी यंदाची ही चंद्रपूर लोकसभेची निवडणूक व्यक्तीगत पातळीवर आली आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा संपूर्ण भाषण…