वीज वितरण कंपनी विरोधात राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग
अनागोंदी कारभाराबाबत व विविध मागण्यांसाठी निवेदन
बहुगुणी डेस्क, वणी: ग्राहकांना अवैधरित्या अव्वाच्या सव्वा बील पाठवणे, सारखे होणारे भायनियमन, गेल्या दोन तीन वर्षांपासून जोडणीचे शुल्क भरूनही अद्याप वीज जोडणी न करणे, कृषी पंपासाठी अनियमीत पुरवठा करणे, वीज चोरीचा भुर्दंड सर्वसामान्यांच्या माथी मारणे अशा विविध तक्रारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वणी विधानसभातर्फे सोमवारी दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून हजारो लोकांची वीज न वापरताही अवैधरित्या अव्वाच्या सव्वा बिल दिल्याच्या तक्रारी केल्या आहेत. आधी जे वीज बिल यायचं त्यात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. वीज वितरण कंपनी डीपीवरून जेवढी वीज वापरली जाते. त्यानुसार कंपनी वीज बिलाचे वितरण करते. मात्र मध्ये अनेक ठिकाणी वीज चोरी होते. यात जी वीज सर्वसामान्यांनी वापरलेलीच नसते. हा भुर्दंड अवैधरीत्या सर्वसामान्यांच्या माथी मारले जात आहे. एकीकडे वीज वितरण कंपनी वीज चोरी रोखण्यात अपयशी ठरत आहे व त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांच्या माथी मारत आहे. असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या घरी लावलेल्या मीटरचे रिंडींग घेऊन वीज बिल देणे गरजेचे असताना नियमीत रिडिंग न घेता वीज बिल पाठवले जाते. जेवढे जास्त युनीट वीज जळेल त्या नुसार वीजेचा दर असल्याने वीज वापलली नसतानाही ग्राहकांची याद्वारे आर्थिक लूट केली जाते. ग्रामीण भाग हा मोठ्या प्रमाणात वीज भार नियमनाचा फटका सहन करीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतक-यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणीचे पैसे भरले आहेत. त्यांना वीज जोडणी करून देणे गरजेचे होते. मात्र अद्याप त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. उलट इतक्या वर्षांपासून त्यांचे पैसे जमा असल्याने त्याचे व्याज कंपनी खात आहे. त्यामुळे त्यांना व्याजही नाही आणि विजेची जोडणीही आहे असा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘वणी बहुगुणी’शी बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
विजेचा वेळोवेळी खेळखंडोबा होतो. त्याबाबत सर्वसामान्य ग्राहक विचारणा करण्यासाठी कॉल करतात. मात्र तिथला फोन अनेकदा नादुरुस्त असतो. किंवा त्याचे रिसिव्हर खाली ठेवलेले असते. वणी शहराची लोकसंख्या वाढली असतानाही केवळ एकच ज्युनिअर इंजिनियरवर सर्व भार आहे. त्यामुळे कंपनी अनागोंदी कारभार थांबवून अवैधरित्या पाठवलेले अव्वाच्या सव्वा बील रद्द करावे, वीज जोडणी करावी, भारनियमन थांबवावे इ मागणी करत या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास वीज वितरण कंपनीच्या डोक्यात ‘उजेड’ पाडण्यासाठी दे ‘झटका’ मोर्चाचे आयोजन करण्यात येईल, असा इशारा डॉ. महेंद्र लोढा यांनी दिला.