विलास ताजणे, वणी: वेकोलित वाहतूक करणाऱ्या कंपनीत स्थानिकांना डावलून परप्रांतियांना नोकरी देण्याच्या विरोधात वाहन चालकांचे निलजई तरोडा येथे आमरण उपोषण सुरू होते. अखेर दहाव्या दिवशी कंपनीच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या व आज सोमवारी या उपोषणाची सांगता झाली. हे आंदोलन संजय देरकर यांच्या नेतृत्वात लढल्या गेले.
वेकोलिमध्ये एसडी व गौरव या दोन खासगी कंपन्या वाहतुकीचे काम करते. या कंपनीत चालक म्हणून अनेक लोक नोकरीवर आहेत. मात्र कंपनीने नोकरी देताना स्थानिकांना डावलून परप्रांतियांना नोकरीला ठेवले आहे. यामुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. स्थानिकांनी वेळोवेळी याबाबत निवेदन देऊन कंपनीला सूचना केली होती. मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. अखेर तरोडा, बेलोरा, निलजई, उकणी, निवली येथील 9 चालक व काही स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला.
गेल्या 10 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू होते. या समस्येची सोडवणूक करण्यासाठी खा. बाळू धानोरकर यांनी कंपनीशी मध्यस्थी केली. रविवारी वेकोलि व वाहतूक कंपनीने आपले प्रतिनिधी पाठवून आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर सोमवारी दुपारी 2 वाजता संजय देरकर यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडल्याचे जाहीर केले.
कंपनीत स्थानिकांनाच रोजगार मिळालाच पाहिजे – संजय देरकर
बेरोजगारांना न्याय मिळाला याचा आनंद आहे. लोकांनी कंपनीसाठी आपली शेती दिली. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात शेतमजूर बेरोजगार झाले आहेत. मात्र कंपनी आडमुठे धोरण अवलंबत स्थानिकांना रोजागारातून डावलत आहे. हा स्थानिकांवर अन्याय आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाविषयी खा. बाळू धानोरकर यांनी भेट घेऊन चर्चा केली व कंपनीच्या अधिका-यांशी बोलून हा प्रश्न निकाली काढला.