सुशील ओझा, झरी: जवळपास सहा दिवसांपासून हिरव्या झालेल्या खुनी नदीचे पाणी पिण्यास अयोग्य ठरले असून, नदीच्या आसपासच्या विहिरीचे पाणीही पिऊ नये, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्यामुळे नदीसोबत तिच्या किनाऱ्यालगतचे स्त्रोतही प्रदूषित झाले असावेत, असा निष्कर्ष काढला जात आहे. खुनी नदीचा रंग हिरवा झाल्यानंतर या मागचे गूढ उकलण्यासाठी सरकारचा कुठलाच विभाग हालचाल करताना दिसत नाही. सुस्ताडपणाचा कळस म्हणजे पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकांनी ग्रामस्थांच्या समाधानासाठी फक्त पाण्याचे नमुने बाटलीत नेले. ते तपासणीसाठी पुढे पाठवलेच नाहीत, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. .
खुनी नदीच्या हिरवेपणाची चर्चा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या या नदीच्या पात्रात सहा दिवशीही हिरवेपणा कायम होता. या मागचे गूढ उकलण्यासाठी तहसीलदार, पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाने नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. त्याचा अहवाल येण्यास ४८ तासांचा अवधी लागण्याची शक्यता शनिवारी वर्तविण्यात आली होती. सोमवारी हीच शक्यता आठ दिवसांवर गेली. थोडक्यात खुनी नदीचा रंग का बदलला याचे उत्तर मिळण्यास आठ दिवसांचा अवधी लागणार आहे. यामागच्या कारणांचा शोध घेतला असता सरकारी सुस्तपणाचा अनुभव आला. .
तहसीलदार आणि आरोग्य विभागाने अद्याप पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेच नसल्याची माहिती पुढे आली. टाकळीचे ग्रामपंचायत सचिव प्रकाश बळीतयांनी पांढरकवडा येथे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यानुसार, पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल पाणी गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण विभागाने दिला. त्यानुसार, आरोग्य विभागाने गावात जाऊन पाणी पिण्यास अयोग्य असल्याची माहिती दिली.
या अहवालात खुनी नदीचा नव्हे तर तिच्या काठच्या विहिरीचा उल्लेख आहे. त्यानुसार, विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. यात खुनी नदीचा कुठेही उल्लेख नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सरकारी अधिकाऱ्यांनी विहिरीचे पाणी पिऊ नका, असे सांगितल्याने खुनीचे प्रदूषण विहिरीतही आले असावे, अशी शंका उपस्थित होत आहे. नदीच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आल्याने टाकळीसारख्या अनेक किनाऱ्यालगतच्या ग्रामस्थांना पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न पडला आहे.
टाकळीच्या ग्रामपंचायतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय केली आहे. परंतु विहिरीपाठोपाठ इतर ठिकाणच्या बोअरचे पाणी पिण्यास अयोग्य ठरविल्यास गावासमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
हिरव्या पाण्यामुळे जैव संपदा धोक्यात
खुनी नदीचा प्रवाह हिरवा झाल्यानंतर तिच्यात असलेल्या जैव संपदेलाही धोका निर्माण झाला. सलग दुसऱ्या दिवशी तिच्या काठच्या एकाही गावात कुणालाही मासे दिसले नाहीत. याचा अर्थ हे पाणी जैव संपदेसाठी अयोग्य ठरत आहे. काही गावांच्या किनाऱ्यावरील दगडांवर हिरवे चट्टे दिसत आहे. उन्ह पडल्यानंतर सुकलेल्या दगडांवरचे हे चट्टे अनेक ग्रामस्थांनी दाखविले. .
जीवन वाहिनीचा दर्जा नदीला दिला जातो. नदी वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जीवतोड प्रयत्न करीत आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेला नदी आणि तिच्या प्रश्नांशी काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसते. खुनी नदीचा रंग बदलण्यास सहा दिवसांपूर्वीच सुरुवात झाली, परंतु सरकारी यंत्रणांनी तिचे नमुने घेऊन बाटली बंद करण्याशिवाय काहीच हालचाल केली नाही. रंग बदलण्यास नक्की कुठून सुरुवात होते, याचाही शोध घेण्याची तसदी सरकारी यंत्रणांनी घेतलेली नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सरकारी यंत्रणांविषयी संताप निर्माण झाला आहे.
खुनी नदीचे पाणी पहिल्या पर्जन्यवृष्टीत हिरवे झाल्याचे आढळले आहे. ते पाणी पिण्यास योग्य नाही. या भागातील गावांसाठी टॅँकरने पाणीपुरवठा केला जाईल. हिरव्या रंगाच्या पाण्याण्चेय नमूने नागपुरातील प्रयोगशाळेत पाठवून तपासून घेणार आहोत. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करू..
– अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी
पाण्याच्या तपासणीनंतर ते पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे. पाण्यात रासायनिक घटक असावेत अशी शंका आहे. त्याचे निरसन अहवाल आल्यावरच होईल. यवतमाळ येथून हा अहवाल अपेक्षित आहे. .
– चंद्रकांत तायडे, आरोग्य अधिकारी