सुशील ओझा, झरी :ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन साडेतीन वर्षांच्यावर झाले आहे. आदिवासी नगरपंचायत असल्याने विकासकामाकरिता शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येतो. मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे करण्यात येत आहे. तसेच कामाचा दर्जाही सुमार आहे. याविरोधात नगरसेवकांसह नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले असून, नगराध्यक्षांचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक बिरसा मुंडा चौकात हे आंदोलन सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल)ची तपासणी, अभियंता यांची नियुक्ती होऊन सामावून का घेतले नाही, नगरपंचायत अंतर्गत गट नं १\४ क्षेत्रफळ असलेल्या १.४४ वरील हटविले, परंतु अजूनही अनेक गरीब जनता बेघर आहे, त्याची चौकशी, प्रस्तावित कामे सुरू करण्यापूर्वीचे छायाचित्र मागितले, नगरपंचायत अंतर्गत १२ एप्रिल २०१७ मधील विशेष सभेतील ठराव क्र १ ची प्रत मागण्यात आली,
झरी ते जामणी रोडला जोडणारा शिरोला रस्ता शासकीय बांधकाम विभागाचा असताना नगरपंचायत ने ५२ लाख ९९ हजार ५०० रुपये खर्च कसा केला, याची चौकशी, नगराध्यक्षांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्वत:च्या व कुटुंबीयांच्या शिरोला गाव नं ३६० मधील शेत सर्वे नं ४१, ४२, ४३ व ४४ मध्ये पक्क्या नालीचे बांधकाम केले, शिरोला गावातच वरील शेत सर्वे नं.मध्ये अकृषककरिता प्लॉट टाकून विशिष्ठ योजनेतून खर्च केले, नगरपंचायत अंतर्गत २०१६, १७, १८ व १९ मध्ये वृक्षारोपण कुठे केले, त्या स्थळाची माहिती, कोणत्या प्रजातीचे किती वृक्ष लावले, त्यावर झालेला खर्च, नगरपंचायतमध्ये शिरोला येथील लटारी पंडीले यांची डेटा एन्ट्री म्हणून नियुक्ती २०१३ मध्ये करण्यात आली होती.
त्याच कालावधीत ग्रामपंचायत मध्ये क्लर्कची नियुक्तीही करण्यात आली होती. त्या कालावधीतील मांगुर्ला (बु.) मध्ये रोजगार हमी योजनेतील रोजगारसेवकांनी केलेल्या कामाची चौकशीची मागणी, पंडीले यांनी शासनाची फसवणूक करून नगरपंचायतचे क्लार्क म्हणून काम केले आहे. याची संपूर्ण चोकशी करून त्यात सामील असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करा, आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
या उपोषणात नगरसेवक शांता जीवतोडे (कापसे) शेषराव सोयाम, संगीता सोयाम, अशोक निरलकर, गजानन मडावी, लतिका ताडुलवार, कमला येरेवार, रामदास मांडवकर, शारदा गोस्कुलवार, कवलदास कोडापे, नारायण जीवतोडे, पिंटू सोळंकी, हनमंतू बस्तुलवार, राजू शेख महेमूद शेख, कौशल्या जुमनाके आदी बसले आहे.