पंकज डुकरे, कुंभा : रस्ते, पूल विकासाचे महामेरू म्हटले जातात. गावापर्यंत रस्ता येण्यासाठी दशके लागतात. त्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागते, तेव्हा कुठे रस्ता होतो. मात्र संबंधित विभागाच्या अभियंत्याच्या आशीर्वादाने कंत्राटदार थातूर-मातूर कामे करतात. त्यामुळे ते रस्ते दोन ते अडीच महिन्यात मातीमोल होतात. शासनाचा लाखो रुपयाचा निधी वांझोटा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
मारेगाव तालुका कायम उपेक्षित राहिला आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला जनतेच्या प्रश्नाचे सोयरसुतुक नाही. केवळ आपली राजकीय पोळी शेकून घेण्यात राजकीय पुढारी पटाईत. त्यामुळे विकासात तालुक्याचा नंबर ढांग लागतो. तालुक्यातील रस्ता नसलेलं गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या कोथुर्ला गावाची हाक आमदार संजीव रेड्डी बोदकूलवर यांच्यापर्यंत कशी बशी पोहचली. प्रशासनाला वारंवार दिलेले निवेदन व आंदोलनाचा कुठलाही उपयोग झाला नसल्याची खंत गावकऱ्यांनी आमदार महोदयांना सांगितली. त्यामुळे हळवे झालेले वणी विधानसभेचे आमदार बोदकुलवार यांनी पंतप्रधान खनिज कल्याण क्षेत्र अंतर्गत महादापेठ(फाटा) ते कोथुर्ला असा अडीच कि.मी. रस्त्याकरिता ६० लाख रुपयाचा भरघोस निधी मंजूर केला.
त्याचे रीतसर उद्घाटन तत्कालीन मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते केले. गावात एका दशकानंतर रस्ता होत असल्यामुळे गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. मात्र कंत्राटदाराच्या मनमर्जीप्रमाणे काम करण्याच्या पद्धतीमुळे रस्त्याची दबाई, खडीकरण, सिल्वरकोटसह आदी कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली गेली. या कामाकडे लक्ष देण्यासाठी नियुक्त अभियंत्यानेही कधी रस्त्याच्या कामाकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ आपले हीत कसे साधता येईल याच्यातच धन्यता मानली. त्यामुळे अडीच महिन्यात रस्त्याची पूर्णतः वाट लागली. त्यामुळे कंत्राटदाराने अभियंत्याचे चांगलेच हात ओले केल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे.
या संदर्भात आमदार बोदकुलवार यांना विचारणा केली. ते म्हणाले की, त्यांनी संबधीत रस्त्याची मोका पाहणी केली.रस्ता पूर्णतः खराब झाला आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. वाट लागलेल्या या रस्त्याचं कधी भलं होईल याची गावकरी वाट पाहत आहे.