ज्योतिबा पोटे, मारेगाव : येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची पहिली आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त शाळा वाबळेवाडी येथे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखासह 50 हून अधिक शिक्षक या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात पंचायत समिती मारेगाव येथील एक आणि पंचायत समिती झरी येथील तीन शिक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा दौरा स्वखर्चाने आणि स्वेच्छेने आयोजित करण्यात आलेला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेली ही अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय ओजस शाळा ही संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी व खासगी शाळांची प्रेरणास्रोत आहे. झिरो एनर्जी ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणारी ही शाळा असून लोकसहभागाच्या माध्यमातून प्रचंड मोठे काम या शाळेने उभे केले आहे. केवळ 32 पटसंख्या ते आज 600 च्यावर विद्यार्थी जेथे घडतात, तीच ही वाबळेवाडीची शाळा. येथील दत्तात्रेय वारे गुरुजींनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे. या शाळेचा स्विडन या देशाशी शैक्षणिक करार आहे.
या शाळेतील शालेय पाठयक्रम केवळ पहिल्या तीन महिन्यातच पूर्ण केला जातो. येथे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रिक कार, इ व्ही एम मशीन यांसारख्या अनेक वस्तूची निर्मिती केली आहे. सध्या ते रॉकेट सायन्सवर कामं करत आहेत. येथे विद्यार्थ्यांनी फुलवलेली परसबाग ही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याच धर्तीवर वणी पंचायत समितीतील जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी व्यक्त केला. वाबळेवाडीचा शैक्षणिक अभ्यासदौरा शिक्षकांना निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे प्रभारी विस्तार अधिकारी लक्ष्मण इद्दे यांनी सांगितले.