वणी: नागपूर ते आदीलाबाद येथे जनावरांची तस्करी करणा-यांच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. यात सुमारे 24 जनावरांची सुटका करण्यात आाली असून तिघांना ताब्यात घेतण्यात आलंय. रात्री दिड वाजताच्या सुमारास पोलिसांनी सिनेस्टाईल ही कारवाई केली आहे.
नागपूर येथून मोठ्या प्रमाणात तेलंगणातील अदिलाबादमध्ये जनावरांची तस्करी होते. मंगळवारी रात्री दिडच्या सुमारास वणीचे पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल हे कर्मचा-यांसह गस्तावर होते. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना नागपूर वरून जनावरांनी भरलेलं वाहन वणीमार्गे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पीएसआय जयप्रकाश निर्मल, सदाशिव मेघावत, रत्नपाल मोहाडे, विकास धडसे, अशोक टेकाळे, सुहास राजूरकर आणि चालक बाळू गवारकर यांनी साई मंदीर परिसरात सापळा रचला.
मिळालेल्या टीपनुसार रात्री एकामागे एक असे चार ते पाच वाहन येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यातील MH 36 F-7865 या वाहनाला थांबवले असता त्याच्या ड्रायव्हरने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं. वाहनांची झडती घेतली असता त्यात 24 जनावरांना निर्दयीपणे बांधल्याचं आढळून आलं.
(अल्पवयीन मुलगी गर्भवती प्रकरणाला नवीन वळण, आरोपीने नसबंदी केल्याची कुजबूज)
या प्रकरणी वाहन चालक फेयाज अहमद मुबारक अली अन्सारी (37), शेख नौशाद शेख मोहमद (20), समीर उर्फ गोलू रज्जाक कुरेशी (20) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व ईटभट्टा रोड, कळमना नागपूर इथले रहिवाशी आहे. या कारवाईत 6 लाख रूपये किमतीचे जनावरे आणि 10 लाख रूपये किमतीचं वाहन ताब्यात घेण्यात आलंय. वाहनामध्ये सापडलेल्या जनावरांना गोशाळेत पाठवण्यात आलं आहे.