निकेश जिलठे, वणी: पेसा कायद्याची कडक अंमल बजावणी करा. अनुसुची 5 व 6 संपूर्ण राज्यात लागू करा. वनहक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करा. अशा विविध मागण्या घेऊन वणी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी वणीत स्वातंत्र्य दिनी रॅली काढली. या रॅलीत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पाडे, तांडे, खेडेगाव, शहर इत्यादी भागातून हजारो बांधवांनी सहभाग घेतला. डॉ. महेंद्र लोढा यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेसा कायद्यानुसार आदिवासी समाजाला मिळणारे आरक्षण कमी करून 50 टक्क्यांवर आणण्याचे जाहीर केल्यामुळे आदिवासी समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची प्रचिती अखेर गुरुवारी आक्रोश रॅलीने झाली. ही रॅली दोन दिवस वणी, मारेगाव व झरी तालुक्यात फिरणार आहे.
दुपारी 12 वाजता वणीतील भीमालपेन देवस्थान येथे नाईक महादू आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आक्रोश रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत आदिवासी समाजातील लोक पारंपरिक कपडे व पारंपरिक वाद्ये घेऊन सहभागी झाले. वाजत गाजत व पेसा कायद्याची कडक अंमलबजावणी करा. आदिवासींचे हक्क हिसकवणाऱ्या सरकारचा निषेध असो, बिरसा मुंडा की जय, वंदे मातरम, भारत माता की जय अशा जयघोषात ही रॅली निघाली. खाती चौक, गांधी चौक, दिपक चौपाटी, आंबेडकर चौक अशी मार्गक्रमण करत याचा शेवट शिवाजी चौकात झाला. इथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकून अभिवादन करण्यात आलं. याच जागी नंतर सभा झाली.
यावेळी बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की स्वातंत्र्य दिनाला आदिवासी समाजावर स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. संविधानात आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी विविध कायदे करण्यात आले आहे. मात्र सरकार त्यांनाच त्यांच्या जागेवरून हाकलत आहे. आदिवासी बहुल भागात त्यांना असलेले आरक्षण कमी करत आहे. ही आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना प्रवाहापासून दूर करणारी आहे.
दरम्यान सभेत कॉ. गीतघोष, डॉ. सुनील जुमनाके यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेनंतर आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना एसडीओं मार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदन दिल्यानंतर रॅली चिखलगाव मार्गे मांगरुड येथे गेली. तिथे आंदोलनकर्त्यांनी मुक्काम केला. तिथे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा आदिवासी गोंडी गितांचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी ही रॅली मारेगावला जाणार असून त्यानंतर घोन्या मार्गे रॅली झरी येथे जाणार आहे. दुपारी चार वाजता झरी येथे रॅलीचा समारोप होणार आहे.