भेळच्या गाडी चालकाचा प्रामाणिकपण… दीड लाखांचे दागिने परत

स्वादिष्ट पावभाजी खाऊ घालणा-या महाराजच्या प्रामाणिकतेचेही कौतुक

0

निकेश जिलठे, वणी: एका समारंभासाठी परिसरातील एका गावाहून एक महिला वणीत आली होती. संध्याकाळी समारंभाच्या आधी भूक लागली म्हणून एका भेळच्या गाडीवर ती थांबली. मात्र जाताना लेडीज बॅग तिथेच विसरून गेली. त्या बॅगमध्ये चक्क चार ते पाच तोळे सोन्याचे दागिने होते व पाच हजार रोख रक्कम होती. मात्र या भेळच्या गाडीवाल्याने ते सर्व दागिने आणि रक्कम परत करत जगात अद्यापही प्रामाणिकता शिल्लक असल्याचा संदेश त्यांच्या कृतीतून दिला.

नानूराम पटेल (43) हे तिळक नगर येथील रहिवाशी आहे. त्यांचे साई मंदिरच्या बाजूला कैलास पावभाजी या नावाने नाष्ट्याचा ठेला आहे. पावभाजी, भेळ, पाणीपुरी विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. 15 ऑगस्टला ते रोजप्रमाने त्यांच्या ठेल्यावर असताना पाच वाजताच्या दरम्यान तिथे घोन्सा येथील एक महिला नाष्टा करण्यासाठी आली. नाष्टा केल्यानंतर त्या गडबडीत त्यांच्याजवळ असलेली बॅग तिथेच विसरल्या.

बराच वेळी ती बॅग तिथेच होती. नानूरामला एखाद्या ग्राहकाची बॅग असेल असे वाटून त्यांनी आधी त्याकडे दुर्लक्ष केले मात्र एक दोन तासानंतरही ती बॅग कुणीही घेऊन न गेल्याने त्यांनी ती बॅग उघडून बघितली. बॅग उघडताच त्यांना त्यात चार ते पाच तोळे सोन्याचे दागिने तसेच सोबत पाच ते साडेपाच हजारांची रोख रक्कम असल्याचे दिसून आले. कामाच्या गडबडीत कुणी ती बॅग उचलून नेऊ नये यासाठी त्यांनी ती बॅग घरी नेऊऩ ठेवली व परत ते व्यवसायासाठी ठेल्यावर परत आले.

ठेला बंद करत पर्यंत कुणीही बॅगसाठी आले नाही. अखेर ठेला बंद करताना रात्री दहा वाजताच्या दरम्यान ती महिला तिच्या पतीसोबत आली व बॅगबाबत विचारणा केली. त्यांनी ती बॅग सुरक्षीत असून दुस-या दिवशी सकाळी ओळख पटवून बॅग घेण्यास सांगितले. अखेर शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ती महिला तिच्या पतिसोबत नानूराम यांच्या घरी गेली. तिथे त्यांनी बॅगचे वर्णन व बॅगमध्ये असलेल्या वस्तूंची संपूर्ण माहिती दिली. बॅग त्या महिलेची असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी ती बॅग त्या दाम्पत्याच्या स्वाधीन केली.

एका कार्यक्रमाला आल्यामुळे तिथे परिधान करण्यासाठी दागिने आणल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र जेव्हा बॅग हरवल्याचे लक्षात येताच संपूर्ण वेळ बॅग शोधण्यात गेला. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सर्व ठिकाणी जाऊन चौकशी केली. हरवलेली बॅग परत मिळेल, असे वाटलेच नाही. अखेर शेवटी पावभाजीच्या ठेल्यावर गेल्यावर त्यांनी बॅग सुरक्षीत असल्याचे सांगताच जीव भांड्यात पडला, तेव्हा त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते. अशी माहिती महिलेने दिली.

नानूराम पटेल हे मुळचे राजस्थान येथील रहिवाशी आहे. 20 वर्षांआधी ते वणीत आले. सुरुवातीचे काही वर्ष त्यांनी मारेगाव येथे भेळ व पाणीपुरीची गाडी लावली होती. काही वर्षानंतर ते वणीत आले व वणीत त्यांनी यवतमाळ रोडवरील साई मंदिराच्या बाजूला पावभाजी व भेळचा ठेला लावला. तेव्हापासून ते वणीतच व्यवसाय करत आहे. तिळक चौक येथील प्रसिद्ध कैलास पावभाजीचे मालक ओमप्रकाश पटेल हे त्यांचे साळे होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अर्धापाव पेढा हिच बक्षिसी…
वडिलांनी चार पैसे कमी कमवले तरी चालेल. पण कुणाला लुटून पैसे कमवायचे नाही अशी शिकवण दिली आहे. आजच्या लोकांना प्रचंड घाई गडबड असते. याआधीही अनेकदा लोक त्यांच्या वस्तू विसरले आहेत. खासकरून मोबाईल विसरणा-यांचे प्रमाण यात अधिक आहे. जेव्हा मुलं मोबाईल मागण्यासाठी येतात तेव्हा मुलांना अर्धा पाव पेढा आणून साईबाबाच्या मंदिरात चढवायला लावतो. तर उरलेल्या पेढ्याने तोंड गोड करायचे इतकीच याची बक्षिसी असते. – नानूराम पटेल

आज एखाद्या व्यक्तीच्या खिश्यातून साधी शंभरची नोट खाली पडली तर लोक त्यावर पाय देऊन ती व्यक्ती समोर गेल्यावर उचलतात. इथे तर चक्क सुमारे दीड लाखांचा ऐवज होता. मात्र आयुष्यात केवळ पैसेच महत्त्वाचे नसून प्रामाणिक आयुष्य हेच खरे आयुष्य मानणारे नानूराम यांच्या सारखे लोक जगात आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेमुळे एका महिलेला संपूर्ण आयुष्याची कमाई मिळाली. नानूराम यांच्या प्रामाणिकतेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.