विवेक तोटेवार, वणी: झरी तालुक्यात एका झोपडीचं वीज बील लाखाच्या घरात आलं. त्या पाठोपाठ पुन्हा केवळ दोन खोल्या असलेल्या महिलेला १ लाखाचं वीज बिल आलं. वीज वितरण कंपनीचा हा गलथानपणा संपता संपत नाही. म.रा.वी.मं.चं खाजगीकरण झालं आणि ही कंपनी जणू सामान्यजनांच्य जीवावरच उठली. सदर महिला ही कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करीत असल्याचे समजते. हे बिल पाहून महिला ही वितरण कंपनीत गेली असता तिच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती आहे.
संध्या बापूराव घोंगे ही महिला वणीतील शिवाजी चौकात राहते. ती टेलरिंगचे काम करून कसाबसा आपला उदरनिर्वाह चालविते. ती तिच्या मालकीच्या टिनाच्या दोन खोल्या असलेल्या घरात राहते. मे महिन्याच्या अगोदर मीटर बंद असल्याने तिला ऍव्हरेज बिल देण्यात येत होते. तिने याबाबत विद्युत विभागात तक्रारही दिली. परंतु याचे काहीही करण्यात आले नाही. नंतर मी महिन्यात महिलेच्या घराचे विद्युत मीटर बदलण्यात आले. त्यानंतर तिला तब्बल 1 लाख 5 हजाराचे बिल पाठविण्यात आले.
सदर बिल तिला मिळालेच नाही. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात मागील बिल जोडून 1 लाख 18 हजार 400 रुपयांचे बिल पाठविण्यात आले. इतके बिल कसे आले म्हणून याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर 25 हजार 620 रुपयांचे बिल भरण्यास सांगण्यात आले. जोपर्यंत बिल भरले जात नाही तोपर्यंत वीज मिळणार नाही अशी टोकाची भूमीका महावितरणाने घेतली आहे.
अशी तुघलकी वसुली महावितरण करीत असल्याचे दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे संध्या यांच्या विद्युत मीटरमध्ये रिडींग हे 963 दाखविले आहे. एवढ्या युनिटचे बिल इतके कसे आले याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.