सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाला, शिराटोकी पोड येथे अनधिकृत तेंदूपत्ता संकलन सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने वनविभागातर्फे सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात आली होती. परंतु ठेकेदार हा कुणालाही न जुमानता तेलंगणातील वरंगल येथील श्रीदेवी ॲण्ड कंपनी यांना खरेदी केलेला पाच लाखांचा ५९ गोणी तेंदूपत्ता देऊन चारचाकी वाहनाने पसार झाला. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गडचिरोली गाठून ट्रक जप्त केला. फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहे.
२०१९ करिता पांढरकवडा येथील अब्दुल्ला जगमोहन गिलाणी हे परवानाधारक ठेकेदार असून, संकलन करण्याकरिता वनविभागाच्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये रीतसर निविदा सादर करून वनविभागाच्या मान्यतेने भीमनाळा शिराटोकी गावाचे तेंदुपत्ता खरेदीचे काम त्यांनी घेतले आहे. परंतु वसंत फुलू कुमरे याने शिराटोकी व भीमनाळा गावात अवैध मार्गाने बेकायदेशीररीत्या तेंदूपत्ता गोळा करीत असल्याची माहिती तथा तक्रार २५ मे रोजी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही वसंत कुमरे हा तेलंगणातील श्रीदेवी ॲण्ड कंपनीला बेकायदेशीर ४८ हजार ६०० रुपयांचा वनोपज परवाना बनवून वाहन क्र. एम. एच. ३३-४३५५ मध्ये भरून चालक कय्यूम रशीद कुरेशी यांच्यासोबत शिराटोकी भीमनाळा येथून २९ मे रोजी सकाळी ८ वाजता ५९ गोणी तेंदूपत्ता भरून शिबला मार्गे नेला. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी मेहेरे, वनपाल लांबतुरे, वनरक्षक पुलेनवार, कानिंदे व इतर कर्मचाऱ्यांनी सदर वाहन थांबवून चौकशी केली. मात्र ठेकेदार कुमरे व चालक कयुम कुरेशी यांनी कोणतीही माहिती न देता तेंदूपत्ता भरलेला वाहन घेऊन पळून गेले.
श्रीदेवी अँड कंपनी, वसंत कुमरे व चालक कयुम कुरेशी यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीची मागणी अब्दुल्ला गिलानी यांनी वारीष्ठकडे केली. यावरून पाटण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच अनुषंगाने पाटण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर तेंदूपत्ता भरलेला चोरीचा ट्रक गडचिरोली येथे आहे.
त्यांनी वरीष्ठ अधिकारी यांची परवानगी घेऊन ठाणेदार अमोल बारापत्रे यांच्या मार्गदर्शनात जमादार रमेश पिदुरक व संदीप सोयाम यांना घेऊन गडचिरोली गाठले व ट्रकचा चालक व मालक त्यांचा शोध घेतला असता आरोपी कयुम कुरेशी व वसंत कुमरे हे दोघेही फरार झाल्याने तेंदूपत्ता भरलेला ट्रक जप्त करून आणला.
आशयर कंपणीचा ट्रक किंमत ८ लाख व ४ लाखाचा तेंदूपत्ता असा एकूण १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातून तेंदूपत्ता भरलेला ट्रक आणल्याने ठाणेदार बारापात्रे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे जमादार रमेश पिदूरकर व संदीप सोयाम यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.