सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरात वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला असून, यामुळे १७ व १८ सप्टेंबर रोजी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
झरी तालुक्यातील मुकुटबनसह मांगली, हिरापूर, राजूर, रुईकोट, अर्धवन, मार्की, खडकी, गणेशपूर, अडेगाव, कोसारा, खातेरा, वडद, आमलोन, पिंपरड, बैलमपूर, गाडेघाट व इतर गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील उभी कापसाची झाडे पूर्णत: आडवी झाली. काही ठिकाणी तर झाडे मुळापासून उपटून निघाली आहे. तसेच सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
शेकडो हेक्टर शेतातील नुकसानीमुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. वादळी पावसाने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर, चना आणि ज्वारी पिकांना चांगलेच झोडपले आहे. शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. परिसरातील बहुतांश गावातील शेकडो हेक्टरवरील शेतीपीक निकामी झाल्याने शेतकरीवर्गांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत.
पहिलेच कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकरीवर्गांच्या हाती आलेल्या कापूस, तूर, सोयाबीन, चना आणि ज्वारी पिकांना वादळी पावसाने हिरावून घेतल्याने संकट उभे झाले आहे. नुकसान झालेल्या पिकाची पाहणी व सर्व्हे करून महसूल, कृषी विभागाने पंचनामा करावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून मांगलीचे सरपंच नितीन गोरे यांनी केली.
मुकुटबनचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर चेलपेलवार, अशोक कल्लूरवार आदींनीसुद्घा तहसीलदार रामचंद्र खिरेकर व कृषी विभागाला निवेदन देऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याची मागणी केली आहे..