वरदहस्तामुळेच गुटखा व सुगंधी तंबाखुची विक्री व तस्करी बिनदिक्कत
कारवाईच्या धास्तीने घरीच थाटला अवैध मालाचा 'संसार'
विवेक तोटेवार, वणी: गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री व तस्करीचा धंदा परिसरात बिनबोभाट सुरू असून या संपूर्ण तस्करीत अन्न व औषध प्रशासन, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिस अशी साखळी असल्याने क्वचितच कारवाईचा फार्स केला जातो. महत्त्वाचं म्हणजे कारवाई करतानाही मोठ्या माशांना धक्का न लावता केवळ छोट्या माशांवर थातुरमातूर कारवाई दाखवली जाते.
2012 साली सरकारने गुटखा बंदी कायदा लागू केला. त्यानुसार गुटख्यावर जरी बंदी असली तरी प्रक्रिया केलेल्या तंबाखूवर तसेच सुगंधी तंबाखूवर मात्र बंदी नव्हती. 2015 साली सरकारने प्रक्रिया केलेला तंबाखू तसेच सुगंधी तंबाखू याच्या विक्री तसेच तुंबाखुच्या प्रक्रियेवर बंदी घातली. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकारी व स्थानिक पोलिस यंत्रणेच्या आशीर्वादाने हा कारभार बिनदिक्कत सुरू आहे.
गुटखा व सुगंधी तंबाखुच्या तस्करी व अवैध विक्रीमध्ये दोन मोठ्या व्यापा-यांची चलती आहे. सिनेमाची कथा शोभावी अशी या दोन्ही सम्राटाच्या अवैध व्यवसायाची कहाणी आहे. या दोघांचेही आपसात पटत नसल्याने यांच्यामध्ये दोन गट तयार झाले आहेत. यातला एक सुगंधी तंबाखू विक्री व तस्करीच्या व्यवसायात आहे. तर दुसरा गुटखा व नकली सुगंधी तंबाखूच्या विक्रीचा किंग मानला जातो. दोघांचे पटत नसल्याने हे दोघंही एकमेकांपासून माल घेत नाही. त्यामुळे एक नागपूरवरून सुंगधी तंबाखू आणतो तर दुसरा वर्धा व हिंगणघाट येथून गुटखा आणतो. तर सुगंधी तंबाखू वरोरा व चंद्रपूरहून येथून आणतो.
अवैध मालाची घरी साठवणूक
प्रशासनाची कारवाई होऊ नये यासाठी दुकानाऐवजी घरीच या मालाची साठवणूक केली आहे. एका चिखलगाव येथील एका ‘नगरी’तल्या स्वत:च्या बंगल्यामध्ये या मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते. इथेच तंबाखूवर प्रक्रिया सुद्धा केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुस-या डॉनने देखील आपल्या अवैध मालाचा ‘संसार’ घरीच थाटला आहे.
साठवणूक केलेल्या मालाचे वितरण हे अतिशय गुंतागुंतीचे व जोखीमेचे काम आहे. त्यामुळे तस्कर वितरणासाठी थेट काही व्यक्तींची मदत घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मटक्याच्या पट्या छापून आणून देणारा ‘जफर’ हा सुद्धा यातल्या एका डॉनचा ‘राईट हॅन्ड’ म्हणून काम करतो. तो त्याच्या सेंट्रो गाडीने सुगंधी तंबाखूचा माल वितरीत करतो.
अवैध व्यवसायाला प्रशासनाचा वरदहस्त ?
या व्यवसायात दोन गट असल्याने याची वसुलीही वेगवेगळी होते. यात एक गट हा आंबेडकर चौक आधी तर दुसरा गट आंबेडकर चौक नंतर कार्यरत आहे. दोन्ही गटाची वसुली ही वेगवेगळी होते. हे काम सुरळीत चालावे यासाठी स्थानिक खाकीसह यवतमाळ येथील अधिकाऱ्याला रसद पुरवली जाते. तसेच अन्न व औषधी प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यालाही महिन्याकाठी विशिष्ट वाटा पुरवला जात असल्याची माहिती आहे.