सुशील ओझा, झरी: शेतकरी वर्गाची आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून 13 एप्रिल 2020 पासून मुकुटबन केंद्रावर आधारभूत किमती नुसार चना व तुरीची खरेदी केली जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी दररोज 30 शेतक-यांना चना व 20 शेतक-यांना तूर आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही खरेदी सकाळी 6 ते सं. 5 पर्यंतच केली जाणार आहे. तसेच माल आणण्यासाठी शेतक-यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
तूर व चनाच्या खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ तालुका झरी जामनी यांनी तहसीलदार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना संयुक्त निवेदन दिले. त्या नुसार त्यांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामूळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. खरेदी बंद असल्याने शेतक-यांचा शेतमाल घरातच पडलेला आहे. खरेदी सुरू होत असल्याने शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे
शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. १३ एप्रिल २०२० पासून आनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. तसेच खरेदी विक्री संघ किंवा बाजार समिती कडून फोन किंवा एसएमएस आल्याशिवाय कुणीही माल केंद्रात आणु नये असे आवाहन कृषी उत्पन्न समितीचे सचिव रमेश येल्टीवार व खरेदी विक्री चे व्यवस्थापक प्रकाश गोंगलवार यांनी केले आहे.