घरात राहूनच भीम जयंती साजरी करा, जयंती मंडळांचे आवाहन

पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन न करण्याचे आवाहन

0

बहुगुणी डेस्क, वणी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातूनच साजरी करावी असे आवाहन वणीतील भीम जयंती मंडळांतर्फे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ जाऊन कुणीही अभिवादन करू नये. तसेच त्या परिसरात कुणीही गर्दी करू नये. कुणीही पुष्पमाला आणण्यासाठी घराबाहेर निघू नये. संचारबंदीचे पालन करावे, कायद्याचा भंग करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले जात आहे.

दरवर्षी भीम जयंती उत्सवाला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते. दुपारी बाईक रॅली निघते. तसेच संध्याकाळी वणीतील विविध परिसरातील मंडळाची रॅली एकत्र येऊन भव्य रॅली काढली जाते. मात्र यावर्षी या सर्व गोष्टी टाळून घरात राहूनच आणि साधेपणात जयंती साजरी करावी असे आवाहन आंबेडकरी अनुयायांकडून करण्यात येत आहे.

वणीमध्ये सम्राट अशोक नगर, दामले नगर, विठ्ठलवाडी, मनिष नगर, पंचशिल नगर, भीम नगर इत्यादी परिसरातील मंडळातर्फे संध्याकाळी वणीत रॅलीचे आयोजन केले जाते. यात मंडळातर्फे वाजत गाजत रॅली काढली जाते. या सर्व रॅली टागोर चौकात एकत्र येऊन शहरात एक भव्य रॅली काढली जाते. त्याचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होते. त्या ठिकाणी बुद्ध वंदना घेऊन रॅलीचा समारोप होतो.

सोशल मीडियात सूचवले जात आहे विविध उपक्रम
काही तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घरी बसून भीम जयंती कशी साजरी करावी याबाबत विविध उपक्रम सुचवले आहेत. यात प्रमुख्याने पुस्तक वाचन, 18 तास अभ्यास अभियान, राज्यसभा टीव्हीवरील संविधान मालिकेचे एपिसोड बघणे यासह गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य वाटून साजरी करण्याचेही सुचवले जात आहे. यासह ऑनलाईन चित्रकला, प्रश्नमंजुषा, निबंध, अशा स्पर्धा आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा उपक्रम सुचवला जात आहे.

भारतीय बौद्धमहासभेचे आवाहन
दिनांक 14 एप्रिल 2020 ला सकाळी 10 वाजता घरीच उंच जागी भगवान बुध्द आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती, अगरबत्ती लावावी. घरी फुलं असल्यास त्याची माळ तयार करून ती फोटोला अर्पन करावी व बुद्धवंदना घ्यावी. याशिवाय सुत्तपठण, त्रीसरण, पंचशील, सब्ब्सूख गाथा, धम्मपालन गाथा, आशीर्वाद गाथा आणि सरणतय गाथा घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.