सुशील ओझा, झरी: आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेला… खिशात एक छदामही नाही… त्यांच्या डोक्यात केवळ धान्य खरेदी करण्याची चिंता… कुठेही मार्ग दिसत नव्हता…. वेळ किती ही कठिण असली तरी माणूसकी अद्यापही जिवंत आहे हे ग्रामस्थांनी दाखवलं…. अन् त्यांच्या घरात चूल पेटली… ही कहाणी आहे झरी तालुक्यातील माथार्जून गावातील….
माथार्जुन हे आदिवासी समाजाचे तालुक्यातील मोठे गाव आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व कामं बंद असल्याने लोकांचे रोजगार गेले आहे. काही लोकांकडे साधे रेशनचे धान्य उचलण्या इतपतही पैसे नव्हेत. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली होती. ही बाब ग्रामविकास अधिकारी विजय उईके यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत ग्रामपंचायतीला माहिती दिली.
ग्रामपंचायतीने तातडीने पावलं उचलत गावातून वर्गणी गोळा करण्याचे ठरवले. यासाठी तरुण होतकरू पुढे आले. त्यांनी गावातील लोकांकडून वर्गणी गोळा करण्यास सुरूवात केली. लोकांनीही दानशुरतेचा प्रत्यय देत भरभरून मदत केली. अखेर तब्बल ५५ हजार एवढी रक्कम लोकवर्गणीतून जमा झाली. या वर्गणीतून ज्या लोकांना रेशन उचलण्यासाठी पैसे नव्हते अशा लोकांना मदत करण्यात आली. त्यांना महिनाभराचे रेशन घेऊन देण्यात आले.
एकमेकांना सांभाळून घेणे हीच माणूसकी आहे – विजय उईके
कोरोनामुळे एकीकडे लोकांना आरोग्य जपावे लागत आहे. तर दुसरीकडे लोकांना जगण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. या कठिण प्रसंगी लोकांनी एकमेकांच्या मदतीला धावून येणे गरजेचे आहे. केवळ थोडेसे पैसे नसल्याने उपासमारीची वेळ येणं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. गावातील लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेऊन सर्व लोक कठिण प्रसंगी एक आहोत हे दाखवून दिले आहे. – विजय उईके, ग्रामविकास अधिकारी
उरलेल्या पैशामध्ये ग्रामपंचायतीले गावात सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. तसेच गावात फवारणी करून संपूर्ण गाव निर्जंतुक करण्यात आले. या संपूर्ण घटनेत संतोष जंगीलवर, बाबूलाल किनाके, पुंजाराम मेश्राम, दादाराव मेश्राम, राधाबाई किनाके, पोलीस पाटील प्रकाश गेडाम, तंटा मुक्ती अध्यक्ष शरीफ शेख, मिथुन राजूरकर, साई आरेवार यांनी सहकार्य केले.