सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खडकडोह येथे शेतात वीज पडल्याने शेतातील गोठा जळाला. 18 एप्रिलच्या रात्री 3 वाजता दरम्यान ही घटना घडली. यात शेती उपयोगी वस्तू व जनावरांचा चारा जळून खाक झाला. यात शेतक-याचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.
काल रात्री झरी तालुक्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. चिंचघाट येथील शेतकरी विनोद महादेव झाडे यांचे खडकडोह शिवारात शेत आहे. शेतातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठा जळून खाक झाला. ज्यात शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले.
गोठा जळल्याची माहिती शेतकऱ्याने ही माहिती तहसील कार्यालयास दिली. तलाठी पी. एच आडे हे पोलीस पाटील वासुदेव गारघाटे व विनोद टोंगे या दोन पंचसह घटनास्थळी पोहचले. पंचनामा केला असता त्यात शेतक-यांचे 7 गोना कुटार, 2 फवारणी पंप, सर्विस केबल 450 फूट, पाणबुडी मोटर 5 एचपी, नांगर, वखर, टिपन, पेरणीयंत्र, रासायनिक खते 5 बॅग, कवेलू, सागवान फाटे, पलंग व इतर शेती साहित्य असे एकूण दीड लाखाचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.