जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूची विक्री व तस्करी केल्याच्या आरोपात 7 बार व भट्टीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यात केवळ वणीतील अक्षरा या बारवरच तडकाफडकी पुढील कारवाई करत या बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला. इतर प्रकरणातही परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण इतरांवर अक्षरा बार इतकीच तत्परता का दाखवण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारू तस्करी व विक्री प्रकरणी वणी विभागातील अक्षरा बार. यवतमाळ रोड वणी, लॉर्ड बार ऍऩ्ड रेस्टॉरन्ट वरोरा रोड वणी, नेक्टजेन बार ऍन्ड रेस्टॉरन्ट मार्डी, राजूर येथील वृंदावन बार, मुकुटबन येथील देशी दारूची भट्टी, कुंभा येथील जयस्वाल यांची दारू भट्टी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत केवळ अक्षरा बारवरच कारवाई करण्यात आली आहे. जी तत्परता प्रशासनातर्फे अक्षरा बारवर दाखवण्यात आली ती इतर कोणत्याही बार किंवा भट्टीवर दाखवण्यात आलेली नाही. यातील काही बार तर लॉकडाऊनच्या अगदी सुरूवातीच्या काळातील आहे. प्रशासनाच्या या मेहबानीबाबत भेदभाव केल्याचा आरोप परिसरात होत आहे.
दुकानाचे सिल तोडून तस्करी व विक्री
लॉकडाऊन सुरुवातीच्या काळातच बार, वाईन शॉप व भट्टी मधून दारूची अवैधरित्या विक्री व तस्करी होत असल्याचे समोर आल्याने उत्पादन शुल्क विभागाने सर्व दुकानावर सिल लावण्याचे काम केले. मात्र आता दुकानाचे सिल तोडून विक्री होत असल्याचे समोर आले आहे. कुंभा, मुकुटबन येथील भट्टीतून दुकानाचे सिल तोडून दारूची विक्री व तस्करी होत असल्याचे समोर आले. राजरोसपणे सिल तोडून दारू काढण्याची हिम्मत कशी काय केली जात आहे याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहे.
सिल तोडून पुन्हा सिल लावण्याचे प्रकार?
काही भागात दारूच्या दुकानाचे सिल तोडून दुकानातील दारू काढली जात आहे व दारु काढल्यानंतर पुन्हा अवैधरित्या सिल लावले जात असल्याची धक्कादायक माहिती मिऴत आहे. यात उत्पादन शुल्क विभागातील कर्मचा-याचा तर हात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. विश्वसनीय सूत्रानुसार 10-15 हजार रुपयात एका कर्मचा-याद्वारा सिलचे साहित्य दिले जाते. त्या सिलच्या साहित्याद्वारा दुकानाचे सिल तोडून दारू काढल्यानंतर पुन्हा सिल लावले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. यातील सत्यता तपासण्यासाठी या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
कारवाईस होणा-या दिरंगाईबाबत उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला असता…
सर्व दोषी परवानाधारकांवर कार्यवाही – मोहतकर
धाड टाकून पकडण्यात आलेल्या सर्व बार व भट्टीचा अहवाल पाठविण्यात आला आहे. लॉर्ड्स बारला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. कुंभा येथील भट्टीबाबत जिल्हाधिका-यांकडून येत्या दोन दिवसात निकाल येणे अपेक्षीत आहे. या प्रकरणातीलही सर्व दोषी परवानाधारकांवर कार्रवाही होणार आहे.
– प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, वणी